Babaji Kamble Lavani: रिक्षा चालक बाबाजी कांबळे यांच्या नर्तकीला लाजवेल अशा लावणीने जिंकले तमाम प्रेक्षकांचे हृदय; मिळाली मराठी चित्रपटाची ऑफर (Watch Video)
मात्र तेथे खूप मोठी रांग होती. अशा परिस्थितीत इतर वाहन चालकांनी बाबाजींना नृत्य करण्यास सांगितले व बाबाजींनी मित्रांच्या सांगण्यावरून गॅस स्टेशनवर ‘मला जाऊ द्या ना घरी' या लावणीवर नृत्य केले
महाराष्ट्राला लावणीची मोठी परंपरा आहे. आतापर्यंत मुख्यत्वे आपण फक्त महिलांनाच लावणी करताना पाहिले आहे मात्र, सध्या सोशल मिडीयावर एका पुरुषाची लावणी पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. एका नर्तकीला लाजवेल अशी लावणी बारामतीच्या बाबाजी कांबळे (Babaji Kamble) यांनी केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर महाराष्ट्र माहिती केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी शेअर केला होता, त्यानंतर तो ट्रेंडिंग झाला. आता रिक्षा चालक असलेल्या कांबळे यांना दिग्दर्शक घनश्याम विष्णुपंत येडे यांनी मराठी चित्रपटात एका भूमिकेची ऑफर दिली आहे.
अहवालानुसार, कांबळे त्यांच्या इतर वाहन चालकांसह ऑटोमध्ये गॅस भरण्यासाठी गॅस स्टेशनवर पोहोचले. मात्र तेथे खूप मोठी रांग होती. अशा परिस्थितीत इतर वाहन चालकांनी बाबाजींना नृत्य करण्यास सांगितले व बाबाजींनी मित्रांच्या सांगण्यावरून गॅस स्टेशनवर ‘मला जाऊ द्या ना घरी' या लावणीवर नृत्य केले. दयानंद कांबळे यांनी हा व्हिडीओ शेअर करीत लिहिले आहे, ‘लावणी सम्राज्ञी ला लाजवेल असे नृत्य पाहिले आहे का कधी..?’ बारामती तालुक्यातील बाबाजी कांबळे यांचे नृत्य व्हायरल झाल्यानंतर ते इंटरनेट सेंसेशन झाले आहेत.
बाबाजी कांबळे हे मुळचे बारामती तालुक्यातील गुणवडी गावचे आहेत. बाबाजी कांबळे हे ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. दरम्यान, ‘अलख निरंजन’, ‘एलिजाबेथ एकादशी’ अशा काही चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक असलेल्या घनश्याम येडे यांनी बाबजी कांबळे यांची भेट घेतली. त्यांनी कांबळे यांना आगामी दोन चित्रपटात काम करण्यासंदर्भात करारही केला, असे येडे यांनी सांगितले.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ऑटो चालक कांबळे हे नारंगी रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाच्या जीन्समध्ये मनमोहक लावणी करत आहेत. या नृत्यामधील सर्वात मोहक अभिव्यक्ति म्हणजे त्यांच्या चेहर्यावरील हावभाव. या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत 92 हजाराहून व्ह्यूज आणि 4 हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.