राज्यातील गोरगरीबांसाठी 10 रुपयांमध्ये 'शिवभोजन योजना' सुरू करण्यात येणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
हे आश्वासन शिवसेनेने पाळले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे विधानसभेत राज्यात 10 रुपयांत थाळी देण्याची घोषणा केली आहे.
विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात राज्यातील भुकेल्यांना 10 रुपयांत जेवण देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन शिवसेनेने पाळले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी नागपूर येथे विधानसभेत राज्यात 10 रुपयांत थाळी देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. या घोषणेनुसार, 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकित कर्ज माफ केले जाणार आहे.
दरम्यान, 'शिवभोजन योजने'चा राज्यातील अनेक गोरगरिबांना फायदा होणार आहे. सध्या राज्यात 50 ठिकाणी प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर ही योजना संपूर्ण राज्यात राबवली जाणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - 2 लाखांच्या कर्जमाफीने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पूर्ण होत नाही - राजू शेट्टी)
आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत अनेक घोषणांचा वर्षाव केला. यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी अन्नप्रक्रिया क्लस्टरची उभारणी, धान उत्पादकांना 200 रुपये अनुदान, राज्यातील सिंचन प्रकल्पांना गती, राज्यात मुख्यमंत्री सचिवालयाची विशेष कार्यालये, आशा कार्यकर्तींच्या मानधन वाढ, मिहानमधील गुंतवणूक वाढ, आदीं घोषणांचा समावेश आहे.