रत्नागिरीमध्ये 12वीच्या विद्यार्थीनीची इंग्रजीचा पेपर कठीण गेल्याने आत्महत्या

इंग्रजीचा पेपर दिल्यानंतर ती विद्यार्थिनी प्रचंड तणावामध्ये होती. यामध्येच तिने गळफास घेत जीवन संपवलं.

(Photo Credits: Pixabay, Open Clip Art)

महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळाच्या बोर्ड परीक्षेला सुरूवात झाली आहे. यंदा 2 वर्षाच्या कोरोना संकटाचा सामना केल्यानंतर पहिल्यांदाच बोर्डाने पुन्हा ऑफलाईन परीक्षा सुरू केल्या आहेत. दरम्यान 4 मार्चला पहिलाच इंग्रजी विषयाचा पेपर पार पडला आहे. रत्नागिरीमध्ये एका विद्यार्थीनीला इंग्रजीचा पेपर कठीण गेल्याने तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊक उचलले आहे. इंग्रजीचा पेपर दिल्यानंतर ती विद्यार्थिनी प्रचंड तणावामध्ये होती. यामध्येच तिने गळफास घेत जीवन संपवलं.

मीडीया रिपोर्ट्सनुसार ही विद्यार्थीनी सामाजिक उपक्रमांमध्ये कमालीची सक्रिय होती. समाज प्रबोधनासाठी लेक वाचवा, लेक जगवा असा संदेश देत होती. मग अशी मुलगी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कसे उचलू शकते असा प्रश्न पडला आहे. वैष्णवी श्रीनाथ असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती रत्नागिरी मध्ये आई-वडिलांसोबत राहत होती. हे देखील नक्की वाचा: Maharashtra Board HSC Exams 2022: बारावीच्या इंग्रजीच्या पेपर मध्ये चूकीच्या प्रश्नाचा प्रत्येकी 1 गुण मिळणार; बोर्डाची माहिती .

वैष्णवीचे वडील रत्नागिरीमध्ये भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. शनिवार (5 मार्च) सकाळी तिचे वडील दुकानात मुलासोबत निघून गेले होते. संकल्पनगरच्या कारवांची वाडी इथं राहणारी वैष्णवी आपल्या आईसोबत घरातच होती. अभ्यास करण्यासाठी जाते असं सांगून वैष्णवी एका खोलीत गेली. बराच वेळ झाला तरी अजून वैष्णवी बाहेर कशी आली नाही, असा प्रश्न तिच्या आईला पडला तेव्हा आई तिला पाहायला गेली तेव्हा तिने गळफास घेतल्याचं पहायला मिळालं. हे देखील नक्की वाचा:  Maharashtra Board Exams 2022: 10वी,12वी विद्यार्थ्यांच्या ताणतणाव व्यवस्थापनासाठी जिल्हानिहाय मार्गदर्शक व समुपदेशकांची यादी जारी .

यंदा 12वीच्या परीक्षेसाठी 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालं आहे. त्यांच्या सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत 9635 परीक्षा केंद्र सज्ज करण्यात आली आहेत. एका वर्गात 25 विद्यार्थी बसवत परीक्षा केंद्रांवर 12वीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. या परीक्षा 7 एप्रिल पर्यंत चालणार आहेत.