रेल्वे पासचा कालावधी महिन्याभराने वाढवून देण्याची प्रवाशांची मागणी
त्यामुळे रेल्वे पासला एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
कोविड-19 (Covid-19) रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्यात काल रात्रीपासून राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 'ब्रेक द चेन' (Break The Chain) च्या नव्या निर्बंधांअंतर्गत पुढील 15 दिवस सर्वसामान्यांना मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे पासचा कालावधी महिन्याभराने वाढवून द्या, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या मागणीची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सराकारकडे पाठपुरावा करावा, अशीही प्रवाशांची मागणी आहे.
मागील वर्षी देशव्यापी लॉकडाऊनमुळे लोकल ट्रेन्स बंद होत्या. अनलॉकच्या टप्प्यात ट्रेन्स सुरु झाल्यानंतर रेल्वे पासमध्ये प्रवाशांना मुदतवाढ देण्यात आली होती. त्याचप्रमाणे यंदाच्या लॉकडाऊनसदृश्य निर्बंधांनंतर पुन्हा प्रवास सुरु होईल तेव्हा रेल्वे पासमध्ये मुदतवाढ मिळावी, अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे. अन्यथा एप्रिल महिन्यात काढलेला पास वाया जाईल. तसंच मे महिन्यांत या निर्बंधात काही शिथिलता देण्यात येईल किंवा नाही, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.
रेल्वे पासला महिनाभराची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी प्रवाशांच्या वतीने केली आहे. यासाठी रेल्वे प्रवाशांच्या वतीने राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करावी आणि मागणीच्या पूर्ततेपर्यंत केंद्राकडे पाठपुरावा करावा, असेही त्यांचे म्हणणे आहे. (Colour-Coded E-Pass: मुंबई लोकल मध्ये गर्दीचं नियोजन करण्यासाठी 'कलर कोडेड ई पास' यंत्रणेचा होतोय विचार; जाणून घ्या काय आहे हा पर्याय!)
दरम्यान, काल रात्री 8 वाजल्यापासून राज्यभरात संचारबंदीला सुरुवात झाली. ही संचारबंदी पुढील 15 दिवस कायम राहणार असून या काळात केवळ अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. तसंच इतर काही महत्त्वाची कामं देखील या काळात सुरु राहतील. सार्वजनिक वाहतूक केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांसाठीच सुरु राहणार आहे. कोरोनाची झपाट्याने वाढणारी साखळी तोडण्यासाठी हे नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.