Prakash Ambedkar on Mohan Bhagwat: प्रकाश आंबेडकरांचा इशारा, '..तर मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांना तुरुंगात पाठवू'
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जोरदार टीका केली आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये लोकांना भडकवून मते मागितली जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी विजयादशमीनिमित्त केलेल्या भाषणावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जोरदार टीका केली आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये लोकांना भडकवून मते मागितली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मन शांत ठेऊन विचलीत न होता लोकांनी विचार करायला हवा, अशा आशयाचे विधान भागवत यांनी केले. या विधानावर जोरदार टीका करताना अॅड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, भागवत यांचे विधान म्हणजे चोराच्या मनातील चांदणे आहे. जर आपल्या हाती सत्ता आली तर विजयादशमीला बेकायदेशीररित्या शस्त्रपूजा केल्याबद्दल गुन्हा दाखल करुन भागवत आणि पंतप्रधान मोदी यांना तुरुंगात पाठवू.
विजयादशमी निमित्त रावहणदहणाची प्रथा बंद केली जावी. त्यासाठी हिंदुत्त्ववादी संघटनांनी पुढाकार घ्यायलहा हवा, असे अवाहन करत आंबेडकर म्हणाले, मोहन भागवत यांचे भाषण म्हणजे चोराच्या मनातील चांदणे. लोकांची मने खराब करणारे हेच लोक आहेत. या लोकांनी मणिपूरमध्ये हेच केले. मुस्लिमांच्या संदर्भातही ते हेच करत आहेत. औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यानंतर कारवाई करणारे हेच लोक आहेत आणि दंगा वाजवणारेही आरएसएसच आहे.
आरएसएस केवळ निवडणुकीपूर्वी सारवासारव करत आहे. नागपूर येथे आरएसएसचा पार पडणारा मेळावा म्हणजे केवळ शस्त्रपूजा करणारा मेळावा असतो. कारखानदारच केवळ यंत्र आणि शस्त्राची पूजा करतो. पण, संघाने शस्त्राची पूजा का करावी? या प्रश्नाचे उत्तर हे लोक देत नाहीत. आम्ही दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आयोजित केलेला मेळावा हा खरा लोकांचा कार्यक्रम आहे. तिथे लोकांच्या विकासाची दिशा कळते, असेही अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.