प्रकाश आंबेडकर यांच्याकडून 'महाराष्ट्र बंद' मागे; राज्यभरात बंद पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा
संध्याकाळी 4 वाजल्यापासून महाराष्ट्र बंद मागे घेतल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
एनआरसी आणि सीएए सोबतच खाजगीकरणाच्या विरोधात आज (24 जानेवारी) दिवशी आयोजित वंचित बहुजन आघाडीचा बंद आता अखेर मागे घेण्यात आला आहे. संध्याकाळी 4 वाजल्यापासून महाराष्ट्र बंद मागे घेतल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. दरम्यान हा बंद राज्यभर पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. आज सकाळ पासूनचा महाराष्ट्र बंद ला संमिश्र प्रतिसाद मिळत होता. इंदापूर, बारामती, अकोला येथे बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या, तर मुंबई, पुणे शहरामध्ये आर्थिक व्यवहार, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यात आली होती. Maharashtra Bandh: 'वंचित' ने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद ला जाणीवपूर्वक हिंसक वळण देण्याचा प्रयत्न- प्रकाश आंबेडकर.
केंद्र सरकारने सीएए, एनआरसी लागू केले आहे त्यामुळे हिंदू-मुस्लीमांमध्ये दरी पडेल तसेच त्याचा तोटा भारतातील मागासवर्गीयांना होणार आहे. असा दावा करत त्यांनी केंद्र सरकारला पुन्हा आव्हान दिलं आहे. जर केंद्र सरकार एक इंचही मागे हटणार नसेल तर आम्ही त्यांना आता एक इंचही पुढे जायला देणार नाही असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान आज मुंबई सह महाराष्ट्रात काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली. जबरदस्तीने दुकानं उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हिंसाचार झाला नसल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यानुसार घाटकोपरमध्ये झालेली दगडफेक ही बुरखाधारी व्यक्तीने केली होती. त्याचा वंचित आघाडीचा संबंध नाही. संबंधित कोण होती याचा तपास पोलिसांनी करावा, तशी तक्रार देखील करण्यात आली आहे. असेही आंबेडकर म्हणाले.