Nagpur Farmer Suicide: नागपूर येथील शेतकऱ्याचा गळफास, कर्जाच्या ओझ्यामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय
धक्कादायक म्हणजे हा शेतकरी केवळ 28 वर्षांच आहे.
नागपूर (Nagpur) येथील तरुण शेतकऱ्याने गळफास (Nagpur Farmer Suicide) घेतल्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. धक्कादायक म्हणजे हा शेतकरी केवळ 28 वर्षांच आहे. घरातील पत्रा शेडच्या छताला असलेलेल्या रॉडला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या आवस्थेत शनिवारी (19) सकाळी आढळून आला, असे पोलिसांनी सांगितले. विकास नाईक असे या शेतकऱ्याचे नाव आहे. तो टेकाडी गावचा ररिहवासी आहे. शेतीसाठी उचललेल्या कर्जाची परतफेड कशी करायची यामुळे तो सतत चिंतेत असायचा. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे. नागपूर पोलीस घटनेचा तपास करत आहेत. चौकशीनंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे येऊ शकणार आहे.
कंत्राटी शेतीसाठी कर्ज
पोलिसांनी सांगितले की, विकास आणि त्याचा भाऊ आशिष हे कंत्राटी शेती करत असत. या शेतीसाठी त्यांनी त्यांच्या तीन एकर शेतात कापूस आणि तूर लागवड करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांकडून काही पैसे उधार घेतले होते. पीक चांगलेही आले होते. मात्र, पिकावर अचानक रोग आला आणि काही वन्य प्राण्यांचाही हल्ला झाला. त्यामुळे पिकाचे मोठेच नुकसान झाले. परिणामी झालेले नुकसान कसे भरुन काढायचे आणि कर्जाची परतफेड कशी करायची हा सवाल दोन्ही भावांसमोर होता. मात्र, विकासने पाठिमागील काही दिवसांपासून कर्जफेडीचा काहीसा अधिकच ताण घेतला होता. पेरणीसाठी घेतलेले कर्ज फेडण्याच्या दबावामुळे त्याने आत्महत्या केल्याचे पीडितेच्या भावाने व आईने सांगितले. मात्र, घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी कन्हान पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
'शेतकरी आत्महत्येबाबतही गांभीर्याने विचार होणे आवश्यक'
भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाच्या राष्ट्रीय सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेतीचा 17% वाटा आहे. तर, एकूण लोकसंख्येच्या 22% जनता (2011 च्या जनगणनेनुसार) शेतीमध्ये गुंतलेली आहे. ही आकडेवारी पाहता कृषी क्षेत्राचे देशातील स्थान किती महत्त्वाचे आहे हे पुढे येते. त्यामुळे शेतकरी आत्महत्येबाबतही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. या संदर्भात आणि मानवतावादी दृष्टिकोनातून, शेतकरी आत्महत्येच्या शोकांतिकेकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. शेती आणि शेतकरी आत्महत्या या विषयाचे अभ्यासक सांगतात, वेगवेगळ्या सरकारांनी वेळोवेळी वेगवेगळे अल्प-मुदतीचे उपाय शोधून काढले आहेत जे समस्येची मूळ कारणे शोधत नाहीत आणि त्यामुळे आत्महत्येचे धोके कमी होत नाहीत. असे उपाय लोकवादी "विशेष पॅकेजेस" च्या स्वरूपात येतात जे पूर्वाभिमुख दीर्घकालीन धोरणाच्या स्वरूपाऐवजी प्रतिगामी असतात. शिवाय, अनुदान, कर्जमाफी, पीक विमा आणि इतर कल्याणकारी योजना यासारख्या उपाययोजना अयोग्य अंमलबजावणीमुळे अयशस्वी झाल्या आहेत.