Mumbai Local Train: गर्दीच्या ट्रेनमधून एखादी व्यक्ती पडून जखमी झाल्यास रेल्वेला द्यावी लागेल नुकसान भरपाई; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

हुंडीवाला यांनी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला होता व हे एक अविवेकी कृत्य आहे आणि त्यामुळे त्याला ‘अप्रिय घटना’ म्हणता येणार नाही, असा पश्चिम रेल्वेचा युक्तिवाद मान्य केल्यानंतर रेल्वे न्यायाधिकरणाने त्यांचा दावा नाकारला होता

लोकल ट्रेन | प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य-फाइल इमेज)

लोकल ट्रेन (Local Train) ही मुंबईची (Mumbai) जीवनवाहिनी आहे. लोकलमधून प्रवास करताना अनेक अपघात झाल्याचे आपण ऐकले असेल, पाहिले असेल. अशा अपघातांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) एक महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. गर्दीच्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एखादी व्यक्ती पडून जखमी झाल्यास ती घटना ‘अनुचित घटना’च्या कक्षेत येईल आणि त्याबाबत रेल्वेला नुकसान भरपाई द्यावी लागेल. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकल खंडपीठाने गर्दीच्या लोकल ट्रेनमधून पडल्यामुळे पायाला दुखापत झालेल्या 75 वर्षीय व्यक्तीला 3 लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश पश्चिम रेल्वेला दिले.

न्यायालयाच्या 12 एप्रिलच्या आदेशाची प्रत मंगळवारी उपलब्ध करून देण्यात आली. याचिकाकर्ते नितीन हुंडीवाला यांनी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांच्या याचिकेमध्ये करण्यात आला आहे. हे प्रकरण रेल्वे कायद्याच्या कलम 124(ए) च्या तरतुदींखाली येत नाही, असा पश्चिम रेल्वेने युक्तिवाद केला. या कलमांतर्गत अप्रिय घटनांच्या बाबतीत नुकसान भरपाई द्यावी लागते. न्यायमूर्ती डांगरे यांनी मात्र रेल्वेचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यास नकार दिला आणि नमूद केले की, हे प्रकरण कायद्याचे कलम 124 (ए) नुसार ‘अनुचित घटना’ प्रकारामध्येch मोडते.

जुलै 2013 मध्ये रेल्वे क्लेम ट्रिब्युनलने हुंडीवाला यांचा दावा फेटाळला होता. नोव्हेंबर 2011 मध्ये गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेनमधून पाय घसरल्यानंतर झालेल्या दुखापतीमुळे, त्यांनी पश्चिम रेल्वेकडून 4 लाख रुपयांची नुकसानभरपाई मागितली होती. हा दावा फेटाळल्या नंतर त्यांनी या आदेशाला आव्हान देत उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. हुंडीवाला यांनी दावा केला की, या लोकल अपघातामुळे आजपर्यंत त्यांना त्रास होत आहे. चालताना आणि जड वस्तू उचलताना हा त्रास होत आहे. (हेही वाचा: महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे 2 मेला होणारे लोकार्पण पुढे ढकलले, जाणून घ्या कारण)

हुंडीवाला यांनी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला होता व हे एक अविवेकी कृत्य आहे आणि त्यामुळे त्याला ‘अप्रिय घटना’ म्हणता येणार नाही, असा पश्चिम रेल्वेचा युक्तिवाद मान्य केल्यानंतर रेल्वे न्यायाधिकरणाने त्यांचा दावा नाकारला होता. त्यावर आता उच्च न्यायालयाने म्हटले की, मुंबईतील लोकल गाड्यांना 'शहराची लाईफलाईन' असे संबोधले जाते. लोकल रेल्वेतून प्रवास करणाऱ्या मुंबईतील रहिवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी वेळेवर पोहोचण्यासाठी वेळोवेळी धोका पत्करावा लागतो. त्यामुळे या लोकलमधून घसरून दुखापत झालीच तर ती ‘अनुचित घटना’ म्हणून ग्राह्य धरली जाईल व रेल्वेला नुकसान भरपाई द्यावी लागेल.