IPL Auction 2025 Live

Mumbai: स्थलांतरित कामगारांची संख्या वाढल्याने मध्य रेल्वेकडून 3 स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार

त्यामुळे रेल्वेस्थानकात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित कामगारांची गर्दी सध्या दिसून येत आहे.

Migrant Workers (Photo Credits: PTI)

मुंबईत वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव आणि राज्य सरकारने लागू केलेला सेमी लॉकडाऊन यामुळे आता स्थलांतरित कामगारांनी पुन्हा एकदा आपल्या घरची वाट पकडली आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित कामगारांची गर्दी सध्या दिसून येत आहे. अशातच आता मध्य रेल्वेकडून स्थलांतरित कामगारांची संख्या वाढल्याने 3 स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याचसोबत उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांची सुद्धा संख्या वाढवली जाणार आहे.(Mumbai: ऑनलाईन फूड डिलिव्हरीसह अत्यावश्यक सेवासुविधांना 24 तास परवानगी-BMC)

मुंबईत उत्पन्नाचे साधन मिळेल या आशेने आलेल्या स्थलांतरित कामगार आता येथे लॉकडाऊन जाहीर केल्याने हातातील काम जाऊ लागल्याने घरचा रस्ता पकडला आहे. त्यामुळे मध्ये रेल्वेकडून स्पेशल ट्रेन संदर्भात घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार उत्तर प्रदेशातील मांडुआडीहसाठी सकाळी 7.45 वाजता येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिलला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ट्रेन चालवली जाणार आहे. दुसरी ट्रेन येत्या 8 एप्रिल पासून रात्री 11.45 वाजता एलटीटीवरुन लखनौ पर्यंत धावणार आहे. तर तिसरी ट्रेन ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गुवाहाटीसाठी 11 एप्रिलला सकाळी 11.05 वाजता सुटणार आहे. या तीन स्पेशल ट्रेन व्यतिरिक्त मुंबई ते गोरखपूर दरम्यानच्या गाड्यांची संख्या वाढवली जाणार असून त्या 9 एप्रिल आणि 11 एप्रिल दिवशी धावणार आहेत.

कन्फर्म तिकिट असलेल्याच प्रवाशांना या स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करण्यास परवानगी असणार आहे. त्याचसोबत प्रवासादम्यान कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे ही अत्यावश्यक असणार असल्याचे मध्य रेल्वेचे पब्लिक रिलेशन ऑफिसर शिवाजी सुतार यांनी म्हटले आहे.(पुण्यात 109 लसीकरण केंद्र बंद; लसींचा पुरवठा करण्याची सुप्रिया सुळे यांची केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना विनंती)

मुंबईसह भिवंडी, ठाणे आणि पुणे येथील स्थलांतरित कामगारांनी कल्याण रेल्वे स्थानकातून प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. तर पुण्यातील खेड शिवापूर येथील विविध लहान हॉटेल्समध्ये काम करणाऱ्या 13 जणांना सुद्धा रेल्वे स्थानकात पाहिले गेले आहे. त्यापैकी एक अशीष कुमार आरिया (32) याने असे म्हटले की, हॉटेल मालकाने आम्हाला फूड देतो पण पैसे देणार नाही असे म्हटले. त्यामुळे येथे थांबून काय फायदा आहे? असे असल्यास मी माझ्या गावात शेती करीन. माझ्या नातेवाईकांची भाताची शेती असून तेथे मी पेरणीचे काम करीन असे त्या आशीष याने म्हटले.

दरम्यान, एनजीओ मध्ये सुद्धा आता कामगारांचे फोन येत असून त्यांच्याकडे मदत मागितली जात आहे. गेल्या वर्षात जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या दरम्यान हजारो स्थलांतरित कामगारांना एनजीओकडून मदत करण्यात आली होती.