MHADA Exam Paper Leak: म्हाडा परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर आंदोलन; ABVP व NCP चे सदस्य एकमेकांशी भिडले
एबीव्हीपीचे पदाधिकारी शंकर संकपाळ म्हणाले, ‘एमव्हीए सरकारने एक पॅटर्न तयार केला आहे, आधी पेपर फुटले जातात आणि नंतर परीक्षा रद्द केल्या जातात, विविध परीक्षा वारंवार रद्द झाल्यामुळे तरुणांचे भविष्य अंधारात आहे.'
राज्यात याआधी आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्नपत्रिका लीक झाल्याने मोठा गदारोळ माजला होता. आता म्हाडा भरती परीक्षेच्या (MHADA Exam) पेपरबाबत गोपनीयतेचा भंग झाला आहे. त्यामुळे ही परीक्षाच रद्द करण्यात आली. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाकडून 6 आरोपींना पकडण्यात आले आहे. परीक्षा रद्द झाल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) ठाण्यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या निवासस्थानाबाहेर सोमवारी निदर्शने केली. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तरुण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
12 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण भरती परीक्षा होणार होती. परंतु त्याच्या पेपरबाबत गोपनीयतेचा भंग झाला. पेपर लीक होण्याआधीच पोलिसांनी हा पेपर लीक करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले. मात्र आता ही परीक्षा रद्द करण्यात आली, याबाबत ABVP सदस्य निषेध करत होते. त्यांच्या आंदोलनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अशाप्रकारे दोन्ही गटाचे सदस्य एकमेकांशी भिडल्याने थोडा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर संघर्ष आटोक्यात आला.
सकाळी 11 च्या सुमारास ABVP आंदोलक ठाण्यात ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळील मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर जमले आणि त्यांनी महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी वारंवार इशारा देऊनही त्यांनी परिसर सोडण्यास नकार दिला. याचवेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचल्याने दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांनी 100 आंदोलकांना घटनास्थळावरून हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आम्ही घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात केला असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही लवकरच ताब्यात घेतलेल्या आंदोलकांच्या संख्येबद्दल एक निवेदन जारी करू.’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मूक निषेधात हिंसाचाराचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर यावेळी पोलीस केवळ मूक प्रेक्षक म्हणून उभे राहिले, असा आरोप अभाविपने केला आहे.
एबीव्हीपीचे पदाधिकारी शंकर संकपाळ म्हणाले, ‘एमव्हीए सरकारने एक पॅटर्न तयार केला आहे, आधी पेपर फुटले जातात आणि नंतर परीक्षा रद्द केल्या जातात, विविध परीक्षा वारंवार रद्द झाल्यामुळे तरुणांचे भविष्य अंधारात आहे. आम्ही शांतपणे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र राष्ट्रवादीचे गुंड आले आणि आक्रमक झाले. पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही आणि त्याऐवजी आमच्याच लोकांना अटक केली.’ (हेही वाचा: म्हाडा परीक्षा पेपर फुटी प्रकरणी 6 आरोपींना 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी)
पेपर फुटणे आणि परीक्षा रद्द होणे याबाबत मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘मी सर्व विद्यार्थ्यांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत होतो, पेपर लीक झाल्यामुळे मीच पुढाकार घेऊन या प्रकरणाची चौकशी केली आणि सर्वांसाठी न्याय्य निर्णय घेतला. म्हाडा आता खासगी संस्थांना सामावून न घेता स्वतःची परीक्षा घेणार आहे. म्हाडासाठी आवश्यक नोकर भरतीतील परीक्षेची प्रश्नपत्रिका म्हाडा स्वत: तयार करेल.’