मुंबई: लाखभर रुपयांनी भरलेली बॅग विरार लोकलमध्ये हरवली अन् तासाभरात सापडली

येथे विविध प्रकारची, प्रवृत्तींची लोकं आढळून येतात. त्यामुळे मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हरवलेली वस्तू सहजासहजी सापडत नाही. मात्र नागेश सावंत याला अपवाद ठरले आहेत.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

मायानगरी मुंबईत प्रत्येकजण आपल्या पोटाची खळगी भरायला आणि आपली स्वप्न साकारायला येत असतो. येथे विविध प्रकारची, प्रवृत्तींची लोकं आढळून येतात. त्यामुळे मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हरवलेली वस्तू सहजासहजी सापडत नाही. मात्र नागेश सावंत याला अपवाद ठरले आहेत. त्यांची लाखभर रुपयांची बॅग हरवल्यानंतर तासाभरात परत मिळाली. म्हणजे प्रामाणिकपणा अद्यापही शाबूत आहे, असे म्हणायला हरकत नाही. (4 प्रेयसींवर आपली छाप पाडण्यासाठी चोरी करायचा नव्या कार, पोलिसांनी प्रियकराला ठोठावल्या बेड्या)

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी सकाळी 10.30 च्या सुमारास नागेश यांनी आपल्या भावाकडे जाण्यासाठी दादरहून विरार लोकल पकडली. त्यांच्या जवळ असलेली लाख रुपयांची रोकड भरलेली बॅग त्यांनी डब्यातील रॅकवर ठेवली. मात्र विरार स्टेशनला उतरताना रॅकवरुन ते बॅग काढायला गेले असताना तिथे बॅग नव्हती. या घटनेची खबर सावंत यांनी लगेचच वसई रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी नायगाव, वसई आणि नालासोपारामधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र त्यातून कोणतीही माहिती समोर आली नाही. (अरे बापरे! मोबाइल चोरीसाठी रितसर भरती आणि ट्रेनिंगसुद्धा; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश)

पण तासाभरातच वसई जीआरपी पोलिसांना तुलींग पोलिस स्टेशनमधून फोन आला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश दास (23) हा तरुण लाखभर रोकड असलेली बॅग घेऊन तुलींग पोलिस स्टेशनमध्ये पोहचला होता. राकेशने सांगितले की, स्वतःची बॅग समजून त्याच्या वडीलांनी रोकड भरलेली बॅग उचलून आणली. घरी आल्यानंतर चुकीची बॅग आपल्याकडे आल्याचे समजताच राकेशने पोलिस स्टेशन गाठले आणि सावंत यांना त्यांची बॅग परत मिळाली. राकेश दासच्या या प्रामाणिकपणा बद्दल पोलिसांनीही त्याचे कौतुक केले.