Maharashtra Lockdown: उद्या रात्री 8 पासून राज्यात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांना विनंती
ही विनंती सरकारच्या सर्व मंत्र्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसर्या लाटेमध्ये संसर्गाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामुळे राज्यातील आरोग्यसेवा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. सध्या राज्यात अनेक निर्बंध लागू आहेत मात्र आता महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन (Lockdown) लागू शकते. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांनी राज्यातील ऑक्सिजनच्या स्थितीचा उल्लेख करून, राज्यातील लॉकडाऊनकडे लक्ष वेधले आहे. टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या रात्री 8 वाजेपासून संपूर्ण लॉकडाउन लागू करण्याची विनंती केली आहे. ही विनंती सरकारच्या सर्व मंत्र्यांच्या वतीने करण्यात आली आहे. आता याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील.
महाराष्ट्राचे मंत्री अस्लम शेख म्हणाले, राज्यातील ऑक्सिजनचा पुरवठा पाहता महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. यासंदर्भात लवकरच मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येतील. 14 एप्रिलच्या रात्रीपासून राज्याने 15 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली होती. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावावे लागेल. आता उद्या संध्याकाळी 8 नंतर मुख्यमंत्री राज्यातील लॉकडाऊनबाबतच्या निर्णयाची घोषणा करतील असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
आज दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत जवळपास सर्व कॅबिनेट सदस्यांनी मुख्यमंत्र्यांकडे संपूर्ण लॉकडाऊनचे आवाहन केले. यानंतर, बैठकीत जवळजवळ निश्चित करण्यात आले आहे की, वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी बहुदा 15 दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन लादला जाईल. मंत्रिमंडळातील सदस्यांनी संपूर्ण लॉकडाउन लादण्याची तयारी सुरु केली आहे. (हेही वाचा: बॉलिवूड कलाकारांच्या व्हॅनिटी व्हॅन्स आता मुंबईत नाकेबंदीसाठी रस्त्यावर उतरलेल्या पोलिस कर्मचार्यांच्या दिमतीला)
दरम्यान, कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजच सरकारने एक महत्वाचा निर्णय जाहीर करत, सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांची दुकान (चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडी सह) त्याचप्रमाणे कृषी अवजारे व कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने, पावसाच्या हंगामासाठी साहित्य (वैयक्तीक व संघटनात्मक) सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत उघडे राहतील असे सांगितले आहे.