IPL Auction 2025 Live

Eknath Khadse: राष्ट्रवादी प्रवेशाबाबत एकनाथ खडसे यांनी सोडले मौन; पाहा काय म्हणाले?

भारतीय जनता पार्टीचे (BJP)राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) नाराज असून लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करतील, असे वृत्त गेल्या अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यमांत झळकत आहे.

Eknath Khadse | (Photo Credits: Facebook)

भारतीय जनता पार्टीचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) नाराज असून लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करतील, असे वृत्त गेल्या अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यमांत झळकत आहे. तसेच खडसे हे उद्या म्हणजेच शनिवारी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आज दुपारी ते जळगावात असताना त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मौन सोडले आहे. राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला काहीच बोलायचे नाही. 'नो कमेंट्स', असे उत्तर देत या विषयाचे त्यांनी खंडन केले आहे. ‘माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच आहेत’, असेही खडसे प्रसारमाध्यमांना म्हणाले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर यांनी एका पत्रकार परिषदेत खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोटही केला. खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले की, त्यांना राज्याचे कृषिमंत्रिपद मिळणार हे खडसेंच्या जवळील कार्यकर्ते अगदी छातीठोकपणे सांगत आहेत. मात्र, शुक्रवारी दुपारी खडसे हे खासगी कामानिमित्त जळगावात आले होते. त्यावेळी आपल्या निवासस्थानी असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला कोणतीही चर्चा करायची नाही. मी राष्ट्रवादीत जाणार म्हणून जे मुहूर्त सांगितले जात आहेत, ते सारे मुहूर्त प्रसारमाध्यमांनी ठरवले आहेत". हे देखील वाचा- MNS Appeal To CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मनसचे अवाहन, 'अन्यथा लोकांचा "ठाकरे"नावावरील विश्वास उडेल'

पुणे येथील विधान भवन येथे गुरुवारी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत भाष्य केले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, राजकारणात भेटी गाठी होत असतात. याआधी भाजपची सत्ता असतानाही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून अनेकदा भाजप नेत्यांना भेटलो आहोत. तुम्ही मला गेली कित्येक वर्षे ओळखताच, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत मला मला फारसे माहिती नाही. जेवढे माहिती आहे तेवढे तुम्हाला सांगितले आहे, असेही अजित पवार म्हणाले आहेत.