Maharashtra Board Exams 2022: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदा लेखी परीक्षेसाठी मिळणार वाढीव वेळ
तर दहावीच्या परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिलदरम्यान होतील.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून दहावी (SSC) , बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांसाठी काल बोर्डाने वेळापत्रक जारी केल्यानंतर आज बोर्डाने अजून एक घोषणा केली आहे. कोरोना संकटामध्ये मागील दीड वर्ष अनेक ठिकाणी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुलांचा लिहण्याचा सराव गेला आहे. यामुळे आता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना लेखी परिक्षेसाठी अर्धा तास ते 15 मिनिटं वेळ वाढवून दिली जाणार आहेत. अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, 70, 80, 100 मार्कांचे लेखी परीक्षेसाठी 30 मिनिटं अधिकची दिली जाणार आहेत. तर 40, 50, 60 मार्कांच्या लेखी पेपर साठी 15 मिनिटं अधिक दिली जाणार आहेत. यामुळे आता विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यंदा कोरोनाचं कारण देत विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्येही कपात करण्यात आली आहे. मागील वर्षी बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या आणि अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने निकाल लावण्यात आले होते. यावर्षी कोरोना संकटाच्या सावटाखाली शिक्षण मंडळ ऑफलाईन परीक्षा घेण्याची तयारी करत आहे. हे देखील वाचा: Maharashtra Board SSC, HSC Exam Timetable: दहावी, बारावी 2022 परीक्षांचं विषयांनुसार वेळापत्रक जारी; mahahsscboard.in वरून करा डाऊनलोड.
बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान होतील. तर दहावीच्या परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिलदरम्यान होतील. लेखी परीक्षेसोबतच यंदा 14 फ्रेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत बारावीच्या तोंडी परीक्षा होणार आहे. 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दहावीच्या तोंडी परीक्षा होणार आहे. यंदा दहावीचे पुर्नपरीक्षा, खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार साठी परीक्षा देणारे विद्यार्थी आता नियमित शुल्कासह 26 डिसेंबर पर्यंत अर्ज करू शकणार आहेत तर विलंब शुल्क सह 1 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करू शकतील. तर बारावीचे विद्यार्थी केवळ आता विलंब शुल्कासह 28 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकणार आहेत.