Irshalwadi Landslide: इरशाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्त नागरिकांसाठी मदतीचे आवाहन; जिल्हा प्रशासनाकडून बँक खाते क्रमांक जाहीर, पशुधनाची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभाग मदतीला

पथकांमार्फत जखमी पशुधनास उपचार करणे, मृत पशुधनाचे फोटो व पंचनामे करणे, शास्त्रोक्त पद्धतीने मृत जनावरांची विल्हेवाट लावणे व जखमी पशुधनास खाद्याचे नियोजन करणे इत्यादी कामे करण्यात आली.

Irshalwadi Landslide (संग्रहित संपादित प्रतिमा)

दि.19 जुलै 2023 रोजी खालापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे मौजे चौक-नानिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील मौजे इरशाळवाडी ता.खालापूर येथे दरड कोसळून मोठयाप्रमाणात जनजीवन विस्कळीत होवून पशुधनाचे व खासगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. अशावेळी त्यांना आधार देवून आयुष्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी सामाजिक संस्था/ट्रस्ट/फाँऊंडेशन्स/सीएसआर/दानशूर व्यक्ती यांच्याकडून आर्थिक मदत व साहित्याच्या स्वरुपात मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुढील खाते क्रमांक व पत्ता उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

ज्यांना आर्थिक स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी खात्याचे नाव :- जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी (District Disaster Response Fund), • बँकचे नाव :- स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा,अलिबाग (State Bank of India, Alibag), बँक खात्याचा नंबर :- 38222872300, IFSC Code:-SBIN0000308या बँक खात्यामध्ये निधी जमा करावा. ज्यांना साहित्य स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी उपविभागीय अधिकारी, कर्जत श्री.अजित नैराळे, मो.8390090040, खालापूर तहसिलदार श्री.आयुब तांबोळी, मो.क्र.9975751076 यांच्याशी संपर्क करुन ठिकाणी मदत पोहोच करावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी कळविले आहे.

यासह, या दुर्घटनेत मदत कार्यात पशुधनाची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. पथकामार्फत गुरुवारी 11 शेळ्या व 10 गोवर्गीय जनांवरावर उपचार करण्यात आले. तसेच या ठिकाणी एकूण 3 बैल व एक शेळी मृत आढळून आलेली असून, त्यांचे फोटो व पंचनामे करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शामराव कदम यांनी दिली. (हेही वाचा: Irshalwadi Landslide: रायगड मधील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत मृतांच्या आकड्यात वाढ; एकूण 13 जण दगावले)

या नैसर्गिक आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त व रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी त्वरित उपाययोजनेचे नियोजन केले. घटनास्थळी पशुधनाची काळजी घेण्यासाठी 1 सहाय्यक आयुक्त, 2 पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व एक परिचर यांचे एक पथक यानुसार दोन पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत जखमी पशुधनास उपचार करणे, मृत पशुधनाचे फोटो व पंचनामे करणे, शास्त्रोक्त पद्धतीने मृत जनावरांची विल्हेवाट लावणे व जखमी पशुधनास खाद्याचे नियोजन करणे इत्यादी कामे करण्यात आली.