गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बालगृहातील मुलांसाठी बनवला चुलीवर चहा; मूकबधिर मुलगी वर्षा हिचे स्वत: करणार कन्यादान
नागपूर येथील रेल्वेस्थानकावर अवघ्या एक दिवसाचे नवजात बालक असलेली वर्षा आढळून आली होती. तर समीर हा शिर्डी येथे सापडला होता. दरम्यान, न्यायालयाच्या मध्यमातून दोघांचेही संगोपन वझ्झरच्या बालसुधारगृहात झाले.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी बालसुधारगृहातील मुलांसाठी चक्क स्वत:च्या हातांनी चुलीवर चहा बनवला. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी अमरावती (Amravati) जिल्ह्यातील अचलपूर (Achalpur) तालुक्यात असलेल्या दिवंगत अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृहास नुकतीच (सोमवार, 13 जानेवारी 2020) भेट दिली. या वेळी अनिल देशमुख यांनी स्वत:च्या हातांनी चहा बनविला आणि बालगृहातील मुलांना दिला. या वेळी त्यांनी याच बालगृहात लहानाची मोठी झालेल्या वर्षा या मुलीचे कन्यादान आपण स्वत: करणार असल्याचे सांगितले.
दिवंगत अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृहात शिकलेली मूकबधिर मुलगी वर्षा हिचा याच बालगृहातील मुलगा समीर याच्यासोबत विवाह ठरला आहे. या मुलीचे कन्यादान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी करावी असा प्रस्ताव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांनी ठेवला. गृहमंत्र्यांनी पापळकर यांचा प्रस्ताव लागलीच स्वीकारत वर्षा हिचे कन्यादान करण्यास मान्यता दिली. गृहमंत्री देशमुख पुढे असेही म्हणाले की, हे कन्यादान नागपूर येथे केले जाईल. आज वर्षा आणि समीर यांचे साक्षगंध होत असल्याचे सांगून त्यांनी संभाव्य वर वधूंला पुष्पहार घातले. या वेळी त्यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांच्याविषयी कौतुगोद्गार काढले. शक्य झाले तर कन्यादानावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही उपस्थित राहता येईल का ते पाहिले जाईल, असे देशमुख म्हणाले.
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख कन्यादान करणार असलेली मुलगी वर्षा ही आता 23 वर्षांची आहे. नागपूर येथील रेल्वेस्थानकावर अवघ्या एक दिवसाचे नवजात बालक असलेली वर्षा आढळून आली होती. तर समीर हा शिर्डी येथे सापडला होता. दरम्यान, न्यायालयाच्या मध्यमातून दोघांचेही संगोपन वझ्झरच्या बालसुधारगृहात झाले. (हेही वाचा, धक्कादायक: पंढरपूर येथे शिक्षकांकडून चार मूकबधिर मुलींचा लैंगिक छळ)
दरम्यान, दिव्यांग, मतिमंद मुलांना 18 वर्षांपर्यंत बालगृहात ठेवण्याचा कायदा आहे. परंतू, 18 वर्षांनंतर पुढे त्यांचे काय करायचे त्यांना कोठे ठेवायचे याबबत आपल्या देशात कायदाच नाही. त्यामुळे हा कायदा करण्याबाबत शंकरबाबा पापळकर गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहेत. सामाजिक न्यायमंत्र्यांशी चर्चा करुन पापळकर यांच्या प्रयत्नांना यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे अश्वासनही अनिल देशमुख यांनी या वेळी दिले.