ED Raid On Hasan Mushrif house: हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर पुन्हा एकदा ईडीची धाड
हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल (Kagal) येथील घरावर ईडीने आज पाहाटे 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास धाड टाकली.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालय अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा धाड (ED Raid On Hasan Mushrif house) टाकली आहे. हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल (Kagal) येथील घरावर ईडीने आज पाहाटे 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड पडण्याची ही दुसरी वेळ आहे. ईडीचे चार ते पाच अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे. दरम्यान, राज्याचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे आमदार मुश्रीफ मुंबईला होते. ते आज पहाटे कोल्हापूरला पोहोचणार असल्याची माहिती होती. दरम्यान, ही धाड पडली आहे. मुश्रीफ कोल्हापूरला पोहोचले आहेत की नाहीत याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रीया दिली. हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने पुन्हा पुन्हा धाड टाकणे म्हणजे संबंधित व्यक्तीला नाहक त्रास देण्याचा प्रकार आहे. एकाच व्यक्तीच्या घरावर ईडी, आयटी किती वेळा धाड टाकणार? अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या कारवाया आणि इतर गोष्टींबाबत मुंबई हायकोर्टाने कालच ताशेरे ओढले आहेत. असे असूनही ईडी असा प्रकार घडत आहे. मुश्रीफ यांना त्रास देण्याचे विविध प्रकार या आधीच करुन झाले आहेत. तरीही ते बधत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दबाव टाकण्यासाठी, त्यांना त्रास देण्यासाठी वारंवार हे प्रकार पाहायला मिळत आहेत. खरे म्हणजे देशात असा प्रकार कधीच घडत नव्हता. जो अलिकडील काळात मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे, जयंत पाटील म्हणाले. (हेही वाचा, Hasan Mushrif यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; 24 एप्रिल पर्यंत त्यांच्याविरूद्ध ED ला कठोर कारवाई करण्यापासून रोखलं)
कोण आहेत हसन मुश्रीफ?
हसन मुश्रीफ हे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील राजकारणी आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे सदस्य (आमदार) आहेत. मुश्रीफ यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी 2019 ते 2021 पर्यंत महाराष्ट्र सरकारमध्ये ग्रामीण विकास आणि जलसंधारण मंत्री म्हणून काम केले. शिवाय त्यांनी कामगार आणि कौशल्य विकास मंत्री म्हणूनही काम केले आहे. मुश्रीफ यांनी त्यांच्या मतदारसंघातील विविध विकास प्रकल्प राबवले आहेत. राज्यातील शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी काम केले आहे. मधल्या काळात साखर कारखाना आणि त्यातील व्यवहार यांवरुन मुश्रीफ हे ईडीच्या रडारवर आले आहेत.