मुंबईच्या ट्राफिकमुळे यकृताचा लोकलने प्रवास; अशाप्रकारे प्रवास होणारी भारतातील पहिली घटना

मुंबईमधील ट्राफिकची समस्या पाहता, भविष्यात लोकलने अशा प्रकारे अवयवाची ने आण करण्याचा मार्ग खुला झाला आहे

यकृताचा लोकलने प्रवास (संग्रहित-संपादित प्रतिमा)

आजकाल अवयवदानाचे महत्व चांगलेच वाढत आहे. मृत्युनंतर किडनी, डोळे, यकृत अशा प्रकारचे अनेक अवयव दान करणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत आहे. मुंबईमध्ये बुधवारी अशाचप्रकारे यकृत दान करण्यात आले, मात्र या यकृताचा गरजू व्यक्तीपर्यंत घडलेल्या प्रवासामुळे ही घडणा वैशिष्ठ्यपूर्ण ठरत आहे. हे यकृत ठाण्यावरून दादरला चक्क लोकलने आणले गेले, भारतातील ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईमधील ट्राफिकची समस्या पाहता, भविष्यात लोकलने अशा प्रकारे अवयवाची ने आण करण्याचा मार्ग खुला झाला आहे.

मुंबई लोकलला नागरिकांची जीवनवाहिनी म्हटले जाते, आज खऱ्या अर्थाने हे सिद्ध झाले. ठाणे येथील 53 वर्षांच्या व्यक्तीचा अपघात झाला होता. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी या व्यक्तीला ब्रेनडेड घोषित केले. या व्यक्तीने अवयवदानाकरिता मृत्यूपूर्व नोंदणी केली होती. त्यानुसार या व्यक्तीचे यकृत परळ येथील खासगी रुग्णालयातील एका गरजू व्यक्तीला प्रत्यारोपित करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे यकृत तातडीने परळ येथे पोहचवणे गरजेचे होते. मुंबईमधील ट्राफिक पाहता हे यकृत लोकलने दादरला नेण्यात आले. पुढे अ‍ॅम्ब्युलन्समार्फत परळच्या ग्लोबल रुग्णालयात आणण्यात आले.

या घटनेद्वारे भारतात पहिल्यांदाच ट्रेनने एका अवयवाचा प्रवास झाला आहे. मात्र रेल्वे प्रशासनाला या गोष्टीची कल्पना देण्यात आली नव्हती. ऐन वेळेस रुग्णालय प्रशासनाच्या काही व्यक्तींनी फोनवरून संपर्क साधून ही परवानगी घेतली. कोणत्याही वाहनाने नेताना योग्य त्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब केला पाहिजे. त्यात समन्वयक, संबंधित यंत्रणेची परवानगी, त्यांचे समन्वयक, अवयवाचे व्यवस्थापन, स्वच्छता या सर्व बाबी विचारात घेतल्या पाहिजेत असे जिल्हा अवयव प्रत्यारोपण समितीचे म्हणणे आहे.