जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या 15 टक्क्यांच्या मर्यादेत करण्याचा निर्णय; हसन मुश्रीफ यांची माहिती
आंतरजिल्हा बदल्या या ऑनलाईन पद्धतीने तर जिल्ह्यांतर्गत बदल्या या ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या या राज्य शासनाच्या धोरणानुसार, 15 टक्के मर्यादेपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिली आहे. आंतरजिल्हा बदल्या या ऑनलाईन पद्धतीने तर जिल्ह्यांतर्गत बदल्या या ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत.
कोरोना संकटामुळे या वर्षाच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या या सामान्य प्रशासन विभागाच्या 7 जुलै 2020 रोजीच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने करणे शक्य दिसत नाही. त्यामुळे जिल्हांतर्गत बदल्या सध्या ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. (हेही वाचा - ‘महंमद द मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारण बंदीसाठी केंद्र शासनास पत्र; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती)
दरम्यान, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठीची प्रक्रिया यापूर्वी सुरु केली आहे. त्या अनुषंगाने शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदल्या या प्रचलित धोरणानुसार ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. आंतरजिल्हा बदली प्रक्रिया जलद गतीने राबविण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कामासाठी पुणे आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवश्यक सहकार्य करण्याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा - Guidelines For Bakrid: बकरी ईद संदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केले जाणार; मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती)
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या ऑफलाईन पद्धतीने करण्यासाठी तालुका स्तरावर वेगवेगळी पथके नेमून अर्ज स्वीकारणे इत्यादी व्यवस्था करण्यात यावी. यानुसार, बदली प्रक्रिया पार पाडताना कोरोनाचा प्रादुर्भाव संदर्भातील मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करावे. अर्ज घेण्याच्यावेळी सामाजिक अंतर पाळले जाईल याची दक्षता घ्यावी. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्या या 15 टक्के मर्यादेपेक्षा जास्त होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.