Attempt to Burn in Mumbai Local: दिव्यांग व्यक्तीला मुंबई लोकलमध्ये जीवंत जाळण्याचा प्रयत्न; सीएसएमटी-कल्याण दरम्यानची घटना

सीएसएमटी ते कल्यान दरम्यान धावणाऱ्या मुंबई लोकलमध्ये (Attempt to Burn in Mumbai Local) हा प्रकार शनिवारी (25 मार्च) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडला. एका गर्दुल्याने हा धक्कादायक प्रकार केल्याची माहिती आहे.

Mumbai Local Train | (File Image)

CSMT-Kalyana Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये दिव्यांग व्यक्तीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न मुंबई येथे झाला आहे. सीएसएमटी ते कल्यान दरम्यान धावणाऱ्या मुंबई लोकलमध्ये (Attempt to Burn in Mumbai Local) हा प्रकार शनिवारी (25 मार्च) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडला. एका गर्दुल्याने हा धक्कादायक प्रकार केल्याची माहिती आहे. या घटनेत दिव्यांग व्यक्तीचा हात होरपळला असून, त्याला केईएम (KEM) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रमोद वाडेकर ( अंदाजे वय ३५ ) असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. ठाणे लोहमार्ग पोलिसांकडून दिव्यांगाचा जबाब नोंदविण्याचे काम उशीरपर्यंत सुरु होते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या लोकलने प्रमोद वाडेकर हा दिव्यांग व्यक्ती रात्री प्रवास करत होता. लोकल कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान आली असताना गर्दुल्याने नशेसाठी वापरला जाणारा रसायनयुक्त रुमाल खिशातून काढला आणि त्याला आग लावली. हा रुमाल त्याने वाडेकर यांच्या अंगावर फेकला. ज्यामुळे वाडेकर यांचा डावा हात होरपळला. (हेही वाचा, खचाखच भरलेली एसी लोकल मीरारोड स्थानकातून दरवाजा बंद न करताच धावली; व्हिडीओ वायरल (Watch Video))

घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तातडीने ज्या डब्यात ही घटना घडली त्या ठिकाणी धाव घेतली. पीडित प्रमोद यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने पीडितावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर केईएम येथेच उपचार सुरु आहेत. दरम्यान, गर्दुल्याने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. लोहमार्ग पोलिसांनी दोन पथक स्थापन करुन आरोपचा शोध सुरु केला आहे.

मुंबई लोकल

मुंबई लोकल ट्रेन ही एक प्रवासी रेल्वे प्रणाली आहे जी मुंबई महानगराला सेवा देते. मुंबई रेल्वे भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाते. मुंबई लोकल नेटवर्क हे जगातील सर्वात व्यस्त आणि दाट लोकवस्ती असलेल्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. यामध्ये पश्चिम, मध्य आणि हार्बर या तीन मुख्य मार्गांचा समावेश आहे आणि 300 किमी पेक्षा जास्त अंतर व्यापते. या गाड्या पहाटे ते रात्री उशिरापर्यंत धावतात आणि दररोज 7 दशलक्ष प्रवासी वाहतूक करतात.