IIT Mumbai: ऑक्सिजन टंचाई टाळण्यासाठी आयआयटी मुंबईचा अभिनव उपाय
देशातील कोविड 19 रुग्णांसाठीच्या उपचारार्थ लागणाऱ्या ऑक्सिजनची (Oxygen ) टंचाई कमी करण्याच्या दृष्टीने , भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईने (IIT Mumbai) निर्मितीक्षम आणि अभिनव उपाय शोधून काढला आहे.
देशातील कोविड 19 रुग्णांसाठीच्या उपचारार्थ लागणाऱ्या ऑक्सिजनची (Oxygen) टंचाई कमी करण्याच्या दृष्टीने , भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईने (IIT Mumbai) निर्मितीक्षम आणि अभिनव उपाय शोधून काढला आहे. यशस्वी चाचणी झालेला हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प एका सामान्य तांत्रिक क्लुप्तीवर आधारित आहे. पीएसए (प्रेशर स्विंग एबसॉरप्शन) नायट्रोजन युनिटचे पीएसए ऑक्सिजन युनिट मध्ये रूपांतरण करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईने घेतलेल्या सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये याचे आशादायी परिणाम दिसून आले आहेत. 3.5 एटीएम इतक्या दाबाने 93% ते 96 % शुद्धतेच्या स्तरासह ऑक्सिजन उत्पादन साध्य करता येते. या ऑक्सिजन वायूचा उपयोग विद्यमान कोविड रुग्णालयांमध्ये तसेच येऊ घातलेल्या कोविड -19 विशेष सुविधा केंद्रांमध्ये ऑक्सिजनचा अविरत पुरवठा करण्यासाठी कोविड उपचारासंबंधीत गरजा भागविण्यासाठी केला जाऊ शकतो.
नायट्रोजन युनिट ऑक्सिजन युनिटमध्ये कसे रूपांतरित केले जाऊ शकते? '' याविषयी या प्रकल्पाचे नेतृत्व करणारे आयआयटी मुंबईचे अधिष्ठाता (संशोधन आणि विकास) प्राध्यापक मिलिंद अत्रे यांनी सांगितले की, सध्या अस्तित्वात असलेल्या नायट्रोजन संयंत्र रचनेची योग्य जुळवाजुळव आणि कार्बन ते झोलाइटमधील रेण्वीय चाळणी बदलून हे केले गेले आहे. कच्चा माल म्हणून वातावरणातील हवा शोषून घेणारी अशी काही नायट्रोजन संयंत्रे भारतभर विविध औद्योगिक युनिटमध्ये उपलब्ध आहेत . त्यामुळे हे प्रत्येक औद्योगिक युनिट आपल्या नायट्रोजन संयंत्राचे ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या संयंत्रात रूपांतर करू शकेल,अशाप्रकारे, सध्याच्या सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत हे आपल्यासाठी सहाय्य्यकारी ठरू शकते, "असेही अत्रे यांनी नमूद केले.
हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प आयआयटी मुंबई, टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स आणि पीएसए नायट्रोजन आणि ऑक्सिजन संयंत्र उत्पादक असलेले स्पॅन्टेक इंजिनियर्स , मुंबई यांचा संयुक्त प्रयत्न आहे.
ही संकल्पना प्रत्यक्षात आणून प्रमाणित करण्याच्या दृष्टीने, आयआयटीच्या रेफ्रिजरेशन अॅन्ड क्रायोजेनिक्स प्रयोगशाळेत पीएसए नायट्रोजन संयंत्राचे ऑक्सिजन संयंत्रात रूपांतर केले आहे या पथदर्शी प्रयोगाचा देशभरात फायदा होऊ शकेल अशा प्रमाणित कार्यपद्धतीला अंतिम स्वरूप देण्यासाठी आवश्यक तसेच तो देशभरातील विविध औद्योगिक युनिटमध्ये तातडीने लागू करण्यासाठी लागणारा अभ्यास करण्यासाठी, आयआयटी मुंबई, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स आणि स्पॅन्टेक इंजिनिअर्स यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
आयआयटी मुंबईच्या रेफ्रिजरेशन आणि क्रायोजेनिक्स प्रयोगशाळेमधील नायट्रोजन सयंत्र सुविधेतील पायाभूत सुविधांचा वापर करून त्याचे ऑक्सिजन संयंत्रात रुपांतर करण्याच्या प्रक्रियेचे मूल्यांकन करण्यासाठी स्पॅन्टेक इंजिनियर्सनेआवश्यक घटक प्रयोगशाळेत स्थापित केले. प्रयोगासाठीची ही रचना तीन दिवसात विकसित करण्यात आली आणि वर नमूद केल्याप्रमाणे सुरुवातीच्या चाचण्यांनी आशादायी परिणाम दर्शविला.
या प्रकल्पातील सहयोग आणि भागीदारीबद्दल, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अमित शर्मा यांच्यासह स्पॅन्टेक इंजिनियर्सचे प्रवर्तक आणि आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी (1970 बॅच) श्री. राजेंद्र तहिलियानी, स्पॅन्टेक इंजिनियर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राज मोहन आणि तळमळीने काम करणारेइतर सदस्य यांचे प्रा. मिलिंद अत्रे यांनी आभार मानले आहेत .
अनेक अडचणींचा सामना करत हा प्रायोगिक प्रकल्प वेळेत यशस्वी केल्याबद्दल चमूचे अभिनंदन करताना श्री . अमित शर्मा म्हणाले की, “आयआयटी मुंबई आणि स्पॅन्टेक इंजिनियर्स यांच्याशी भागीदारी केल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे आणि सध्याच्या ऑक्सीजन संकटात देशाला मदत करण्याच्या दृष्टीने अस्तित्त्वात असलेल्या पायाभूत सुविधांचा वापर करून आपत्कालीन ऑक्सिजन निर्मितीसाठी एक अभिनव उपाय शोधायला हातभार लावत आहोत. उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील अशाप्रकारच्या भागीदारीमुळे आत्म-निर्भर भारताच्या दिशेने आपली वेगाने वाटचाल होऊ शकते.''
आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभासिस चौधरी यांनी सर्व सहभागींचे अभिनंदन केले आणि सांगितले की, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील अशाप्रकारची भागीदारी आपल्या देशाच्या वाढीसाठी आणि यशस्वीतेसाठी अत्यंत आवश्यक आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)