Coronavirus: टोमॅटो आणि कोरोना व्हायरस यांचा संबंध जोणाऱ्या 'त्या' वृत्तवाहिनीवर एक महिन्यासाठी बंदी घाला- पृथ्वीराज चव्हाण
संबंधित वृत्तवाहिनीने टोमॅटोचा कोरोना व्हायरसशी संबंध जोडत वृत्त दिले होते. ज्यामुळे टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाची व्याप्ती विचारात घेता त्याबाबत कोणतेही वृत्त अथवा माहिती देताना काळजी घ्या. प्रामुख्याने सोशल मीडियावर प्रसारीत होणाऱ्या माहितीची सत्यता तपासा असे अवाहन वारंवार कले जात आहे. असे असतानाही अनेकदा कोरोना व्हायरस बाबत दिशाभूल करणारी माहिती, वृत्त वृत्तवाहिन्यांतून आणि सोशल मीडियावर प्रसारीत करण्यात येत आहे. अशाच एका वृत्तावरुन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज (Prithviraj Chavan) यांनी संबंधित वृत्तवाहिनीवर एक महिन्यांची बंदी घालण्याची मागणी केली आहे. संबंधित वृत्तवाहिनीने टोमॅटोचा कोरोना व्हायरसशी संबंध जोडत वृत्त दिले होते. ज्यामुळे टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संबंधित वृत्तवाहिणीवर एक महिना बंदी घालण्याची तसेच यापुढे कोरोना व्हायरस बाबत कोणतेही वृत्त देताना केंद्र सरकार आणि ICMR ची मान्यता घेणे अनिवार्य करा अशी मागणी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''एका राष्ट्रीय हिंदी वृत्त-वाहिनीने खोडसाळपणे टोमॅटोला कोरोनाशी जोडल्यामुळे राज्यातील टोमॅटो पिकाचे दर कोसळले आहेत व शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. अशा बेजबाबदार पत्रकारीतेवर कार्यवाही केलीच पाहीजे. आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहीजे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''राज्य शासनाने, या वृत्तवाहिनीवर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी केंद्र सरकारला विंनती करावी आणि या वाहिनीवर किमान १ महिन्याची बंदी घालण्यात यावी. भविष्यात कोरोनाबद्दलचे कोणतेही रिपोर्टींग करताना ICMR किंवा केंद्राची परवानगी घेणे वृत्तवाहिन्यांना बंधनकारक करावे.'' (हेही वाचा, Coronavirus: भारतात कोरोनाचा हाहाकार! गेल्या 24 तासांत आढळले 5242 कोविड रुग्ण, एकूण संख्या 96169 वर)
दरम्यान, कोरोना व्हायरस संकट भारतात दाखल झाल्यावर चिकन आणि कोरोना याचाही संबध असाच जोडण्यात आला होता. चिकन खाल्ल्यामुळे कोरोना होतो अशी दिशाभूल करणारी माहिती आणि खोटा प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून केला गेला. त्यामुळे या खोट्या प्रचाराचा फटका देशातील चिकन व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणावर बसला. या अफवेचा फटका चिकन व्यावसायिकांना इतका बसला की, चिकन उत्पादकांना कोंबड्यांना खड्ड्यात गाडावे लागले होते.