Coronavirus: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्या

यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक परिपत्रक काढून निर्णय जाहीर केला आहे.

MPSC Exam | Image used for Representational Purpose | (Photo Credits: Pixabay.Com)

Coronavirus: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा संयुक्त परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक परिपत्रक काढून निर्णय जाहीर केला आहे.

MPSC ने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने दिनांक 22 मार्च 2020 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिनांक 26 एप्रिल 2020 व 10 मे 2020 रोजी नियोजित अनुक्रमे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट – ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या दोन्ही सार्वजनिक हितास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत. (हेही वाचा - महाराष्ट्रात 891 कोरोनाबाधित; मुंबई, ठाणे सह राज्यात विविध भागात आढळले 23 नवे रूग्ण)

या दोन्ही परीक्षा आयोजनासंदर्भात सुधारित दिनांक आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येतील. तसेच परीक्षेच दिनांक निश्चित झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या आयोगाकडील नोंदणीकृत दूरध्वनी क्रमांकावर एसएमसद्वारे कळवण्यात येणार आहे. उमेदवारांनी वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळाचे अवलोकन करणे उमेदवारांसाठी हितकारक राहील, असंही या परिपत्रकात म्हटलं आहे.