CIDCO Recruitment Scam: सिडकोत नोकरभरतीमध्ये मोठा घोटाळा; बनावट लोकांना कर्मचारी म्हणून दिला जात होता पगार, चौकशीचे आदेश

लेखापरीक्षण अहवाल येत्या एक महिन्यात पूर्ण करावा, असे सांगण्यात आले आहे.

CIDCO (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळमध्ये (CIDCO) भरतीतील कथित अनियमितता समोर आली आहे. त्यानंतर आता इथे गेल्या 10 वर्षात झालेल्या नोकरभरतींचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. सिडकोच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 15 दिवसांपूर्वी नगररचना संस्थेत अस्तित्वात नसलेल्या कर्मचाऱ्यांना पगाराच्या तक्रारी आल्या होत्या.

त्यानंतर मुखर्जी यांनी तातडीने त्यांच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यामार्फत चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार हा घोटाळा 2017 पासून सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. मुखर्जी यांनी सांगितले की, सिडकोमध्ये नोंदणी केलेल्या 28 'बनावट' लोकांची ओळख पटली आहे. त्यांनी सांगितले की एजन्सीच्या मानव संसाधन (HR) विभागाचा एक अधिकारी देखील या रॅकेटचा एक भाग होता, कारण त्याच्या स्वाक्षरीने भरती करण्यात आली होती.

मुखर्जी पुढे म्हणाले, 'ही बनावट स्वाक्षरी असू शकते, परंतु कागदपत्रांवर त्यांची स्वाक्षरी आहे. एकूण 2.80 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी पोलिसांशी संपर्क साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाच्या विभागीय चौकशीचेही आदेश देण्यात आल्याचे मुखर्जी यांनी सांगितले. ते म्हणाले, 'आतापर्यंत आम्ही एका अधिकाऱ्याची ओळख पटवली आहे, परंतु फसवणुकीत सहभागी असलेल्या सर्वांवर कारवाई केली जाईल.' (हेही वाचा: वाहक संपावर गेल्याने नाशिकमधील सिटीलिंक बससेवा ठप्प)

मुखर्जी पुढे म्हणाले की, सिडकोत झालेल्या नोकरभरतींचे सविस्तर ऑडिट करण्याचे आदेशही दिले आहेत. लेखापरीक्षण अहवाल येत्या एक महिन्यात पूर्ण करावा, असे सांगण्यात आले आहे. सिडकोत सुरू असलेला हा घोटाळा तेव्हा उघडकीस आला जेव्हा, एका तरुणाने सिडकोच्या लेखा विभागाला माहिती दिली की, त्या इथला कर्मचारी नाही तरी त्याला सिडकोकडून पगार दिला जात आहे.