Anil Deshmukh CBI Enquiry: भ्रष्टाचार प्रकरणात CBI ची कारवाई सुरू; अनिल देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकांना समन्स
सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रचे माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना समन्स बजावून निवेदने नोंदवण्याची मागणी केली आहे.
Anil Deshmukh CBI Enquiry: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या आरोपांचा तपास करणार्या सीबीआय पथकाने आता कारवाई करण्यास सुरवात केली आहे. सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रचे माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना समन्स बजावून निवेदने नोंदवण्याची मागणी केली आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अनिल देशमुख यांना नुकताचं महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.
केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या चौकशीसाठी महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध प्राथमिक चौकशी (PE) खटला दाखल केला. सीबीआय पथकाने मंगळवारी मुंबईत दाखल होत सर्व संबंधित कागदपत्रे गोळा केली असून मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करत प्राथमिक तपासणी सुरू केली आहे. सीबीआयचे प्रवक्ते आरसी जोशी यांनी सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाने 5 एप्रिल 2021 रोजी दिलेल्या आदेशानुसार सीबीआयने अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. (वाचा - 'ठाकरे सरकार स्वतःचं अपयश झाकण्यासाठी सामान्यांना शिक्षा देत आहे'; लॉकडाऊन वरुन निलेश राणे यांची टीका)
दरम्यान, अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशी थांबविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण तेथे अनिल देशमुख यांना यश आलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार व अनिल देशमुख यांनी मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली. तसेच हे प्रकरण गंभीर असल्याने चौकशी होणे आवश्यक असल्याचा निर्वाळा यावेळी न्यायालयाने दिला. परम बीर सिंग यांनी लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कौल यांनी अनिल देशमुख यांची याचिका फेटाळून लावताना म्हटलं की, तुमच्यावर कोणत्या शत्रूने नव्हे तर तुमचाचं 'राईटहँड' असलेल्या एका व्यक्तीने आरोप केले आहेत. यासह कोर्टाने अनिल देशमुख तसेच परमबीर सिंह यांच्याविरोधात चौकशी करण्यास आदेश दिले आहेत.