Riteish Deshmukh | Instagram @Riteish Deshmukh'

अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख (Riteish Deshmukh) च्या 'राजा शिवाजी' (Raja Shivaji)  सिनेमाच्या कोरिओग्राफी टीम मधील 26 वर्षीय डान्सरचा नदीपात्रामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. दोन दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला आहे. 26 वर्षीय सौरभ शर्मा मंगळवारी (22 एप्रिल) शूटिंग नंतर नदी पात्रात हात धुवायला गेला होता. हात धुतल्यानंतर पोहण्यासाठी उतरला पण पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेला. ही घटना सातारा जिल्ह्यातील कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर वसलेल्या माहुली गावातील आहे. माहुली मध्ये 'राजा शिवाजी' सिनेमाचं शूटिंग सुरू होते.

सौरभ पाण्यात बुडाल्याच्या घटनेनंतर सिनेमाच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला त्याची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक खाजगी संघटनांनी शोधमोहिम सुरू केली. अखेर गुरूवारी (24 एप्रिल) सकाळी साडेसातच्या सुमारास सौरभचा मृतदेह सापडला आहे. सातारा पोलिसांनी सौरभच्या मृत्यूची नोंद अपघाती मृत्यू अशी केली आहे.

'राजा शिवाजी' ची निर्मिती करणार्‍या मुंबई फिल्म कंपनीकडून एक सौरभ शर्मा नदीपात्रात हरवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. घटनेची माहिती मिळताच रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, कोरिओग्राफर रेमो डिसुझा तेथे पोहचल्याचं सांगितलं आहे. या गाण्याचं शूटिंग  दोन दिवस केल्यानंतर ही घटना घडली आहे. त्यानंतर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी शूटिंग थांबवलं आहे. मुंबई फिल्म कंपनीकडून सौरभच्या कुटुंबासोबत संपर्क साधण्याच्या प्रयत्नामध्ये होते. नक्की वाचा: Riteish Deshmukh च्या आगामी 'राजा शिवाजी' सिनेमा सोबत काम करण्याची संधी; डिझायनर्स, टायपोग्राफर्सना केलं आवाहन (Watch Video).  

'राजा शिवाजी' हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर बेतला आहे. या सिनेमामध्ये अभिनेता रितेश देशमुख प्रमुख भूमिकेत आहे.  सोबतच दिग्दर्शनाची जबाबदारी देखील तो सांभाळत आहे. 'राजा शिवाजी' सिनेमा मराठी आणि हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.