जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला मारहाण; वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला आव्हाड यांच्या बंगल्यावर 15 ते 20 जणांकडून मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, या तरुणाने जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 5 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. यावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती. आव्हाड यांनी ट्विटर अकाऊंटवरून आपली भूमिका स्पष्ट केली होती. या भूमिकेवर तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. (हेही वाचा - कोरोना व्हायरस विरोधातील लढाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्विडनचे पंतप्रधान Stefan Lofven यांच्याशी चर्चा केली ; 7 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)
दरम्यान, या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, 5 एप्रिलला माझ्या घरी साध्या वेशातील दोन पोलिस आले. त्यांनी तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलं असल्याचं सांगितलं. या दोन पोलिसांनी मला स्क्रॉपिओ गाडीमध्ये नेलं. माझा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर मला जितेंद्र आव्हाड यांच्या विवियाना मॉल येथील नाथ बंगल्यावर नेण्यात आलं. तेथे जितेंद्र आव्हाडदेखील उपस्थित होते. तेथील 15-20 जणांनी मला मारहाण केली, असंही या तरुणाने फिर्यादीमध्ये म्हटलं आहे.
मारहाण केल्यानंतर या तरुणाकडून माफीनाफा व्यक्त करणारा व्हिडिओदेखील बनवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला रुग्णालयात नेलं आणि तिथे उपचार करून घरी सोडलं, असंही या तरुणाने सांगितलं आहे. दरम्यान, या तरुणाने थोड्याचं वेळात वर्तकनगर पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.