Aurangabad: स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या 22 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
वैभवने गळफास घेतला होता. मृतदेह खाली उतरवून तत्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले परंतु त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले
काही महिन्यांपूर्वी, राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेची पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही, दीड वर्ष झाले तरी मुलाखतीची यादी लागत नसल्याने कंटाळून स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या (Suicide) केली होती. राज्यात अजूनही हे प्रकरण ताजे असताना आता औरंगाबाद (Aurangabad) येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या 22 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबादच्या आडगाव बुद्रुक येथे काल दुपारी ही घटना उघडकीस आली.
वैभव विष्णू विरकल असे या तरुणाचे नाव आहे. वैभवने आपले बी.एससी पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले होते व सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी वैभवचे वडील कामावर गेले होते, तर भाऊ कॉलेजमध्ये गेला होता. घरी वैभव आणि त्याची आई असे दोघेच होते. दुपारी आपण अभ्यासासाठी खोलीत जातोय असे सांगून वैभव आपल्या खोलीत गेला. त्यावेळी आई घरकामामध्ये गुंतली होती. परंतु बराच वेळा झाला तरी वैभव खोलीतून बाहेर आला नाही. आईने अनेक हाकाही मारल्या परंतु आतून काहीच प्रत्युत्तर मिळाले नाही.
त्यानंतर मात्र दरवाजा तोडला गेला व आतील दृश्य पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. वैभवने गळफास घेतला होता. मृतदेह खाली उतरवून तत्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले परंतु त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत चिखलठाणा स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. (हेही वाचा: Mumbai: मुंबईत रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण 45% नी घसरले, पादचारी, सायकलस्वार, मोटारसायकलस्वारांना होता धोका)
दरम्यान, आता एमपीएससीकडून मुलाखतीची यादी जाहीर करण्यात आली व या यादीत स्वप्नील लोणकरच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. ‘ही लिस्ट सहा महिने अगोदर आली असती, तर माझा मुलगा गेला नसता,’ अशी प्रतिक्रिया स्वप्नीलच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. तसेच यामुळे एमपीएससीच्या गोंधळावरही टीका होत आहे.