महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी; दुष्काळाचे सावट हटण्याची चिन्हे
मंगळवारी याचा निकाल दिसून आला. बुधवारी पावसाळी ढग जमा झाल्याने त्याच दिवशी पुन्हा रसायनांची फवारणी करण्यात आली. जालना, औरंगाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांमधील काही भागात या कृत्रिम पावसाने हजेरी लावली आहे.
महाराष्ट्रात एकीकडे पूरस्थिती (Flood) तर दुसरीकडे दुष्काळ (Drought) अशी परिस्थिती आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ हे भाग अजूनही पुरेशा पाण्यापासून वंचित आहेत. या भागातील पाणीटंचाई नष्ट व्हावी म्हणून कृत्रिम पाऊस (Artificial Rain) पाडण्याचा विचार झाला होता. मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला 9 ऑगस्टला सुरुवात झाली. मंगळवारी याचा परिणाम दिसून आला. बुधवारी पावसाळी ढग जमा झाल्याने त्याच दिवशी पुन्हा रसायनांची फवारणी करण्यात आली. जालना, औरंगाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांमधील काही भागात या कृत्रिम पावसाने हजेरी लावली आहे.
सध्या आतापर्यंत एकूण किती कृत्रिम पाऊस पडला याची नोंद घेणे चालू आहे. नाही-होय करत अखेर 14 ऑगस्टपर्यंत या पावसाची संपूर्ण यंत्रणा तयार झाली. त्यानंतर आकाशात पुरे ढग नसल्याने हा प्रयोग लांबला. अखेर मंगळवारी संध्याकाळी पुरे ढग दिसले व त्याच दिवशी या ढगांवर रसायनांची फवारणी करण्यात आली. विमान निघून गेल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी या परिसरात पाऊस पडायला सुरुवात झाली. (हेही वाचा: दुष्काळाचे सावट असलेल्या महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी होणार का? राज्यातील जनतेला उत्सुकता)
बुधवारी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी या गावावर असलेल्या ढगांवर रसायनाची फवारणी झाली. यामुळे करोडी, तिनखडी, मोहटा, कोरडगाव, भिलवडी, मोहजदेवढे, पिंपळगाव, टाकळीमानुर तसेच बीड जिल्ह्यातील शिरूरपर्यंत दमदार पावसाची सुरुवात झाली होती. कृत्रिम पावसाचा हा प्रयोग यशस्वी झाल्याने आता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही या प्रयोग राबवण्यात येणार आहे. याआधी 2003 आणि 2015 साली राज्यात कृत्रिम पाऊस पाडला गेला होता. यंदा राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या योजनेला 29 मे 2019 रोजी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या प्रयोगासाठी सरकार एकूण 30 कोटी रुपये खर्च करत आहे.