Anandacha Shidha: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वितरीत करण्यात येणार 'आनंदाचा शिधा'; संच वेळेत मिळावा यासाठी सर्व यंत्रणा सज्ज

आतापर्यंत एक कोटी 58 लाख जनतेपर्यंत हा शिधा पोहोचलेला आहे.

Anandacha Shidha (संग्रहित संपादित प्रतिमा)

‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Shidha) उपक्रम सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद देणारा ठरेल. हे काम खरे तर खूप मोठे असून हा उपक्रम राबविताना सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. वर्षा निवासस्थान येथे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाच्या लाभार्थींशी संवाद साधण्यासाठी उपस्थित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,  राज्य शासनाने लोकहिताचे विविध निर्णय घेतले आहेत. अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागले आहेत. ‘आनंदाचा शिधा’ चे वितरण हा उपक्रम सुरू करण्यात आला. दिवाळीत याचे वाटप केले तेव्हा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता देखील गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आनंदाचा शिधा वितरण करण्यात येत आहे. हा शिधा संच वेळेत मिळावा यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. 100 टक्के साहित्य जिल्ह्यांना पोहोचले आहे, यातील शिधा संचचे 70 टक्के लाभार्थ्यांनी उचल केली आहे. उर्वरित साहित्य वाटप करण्यात यावे यासाठी प्रशासनाने कार्यवाही गतीने करावी. (हेही वाचा: नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे सहा दिवसात 23 हजार 699 हेक्टरवरील शेतीचे नुकसान)

मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. काही ठिकाणी गारपीट, अवकाळी पाऊस पडत आहे. आम्ही सर्वजण शेतकऱ्यांची दुःख जाणून घेत आहोत. त्यासाठी प्रभावी उपाययोजना देखील करत झालेल्या नुकसानाचे पंचनामेदेखील करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम करत आहोत. केंद्र सरकारच्या धर्तीवर असलेली पी. एम. किसान योजना तशीच राज्य शासनाने ही ‘नमो सन्मान’ योजनाही सुरू केली आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी 1800 रुपये देत आहोत. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्व घटकांसाठी निर्णय घेण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री चव्हाण म्हणाले की, राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वेळेत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आतापर्यंत एक कोटी 58 लाख जनतेपर्यंत हा शिधा पोहोचलेला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला असून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आनंदाचा शिधा, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान (बोनस), शिवभोजन थाळी पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे राबवल्या जात आहेत.