Maharashtra: संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर महाविकास आघाडीतील 'या' मंत्र्याचा नंबर; किरीट सोमय्या यांचे वक्तव्य

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षातील अनेक नेते ठाकरे सरकारवर (Maha Vikas Aghadi) टीकास्त्र सोडताना दिसत आहेत.

Kirit Somaiya | (Photo Credits: IANS)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षातील अनेक नेते ठाकरे सरकारवर (Maha Vikas Aghadi) टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनीही महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांबाबत मोठे वक्तव केले आहे. दरम्यान, संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्यानंतर महाविकास आघाडीतील परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचा नंबर आहे, अशी स्फोटक प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली आहे.

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. यानंतर भाजपाकडून सातत्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी मागणी केली जात होती. अखेर आज त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यावर किरीट सोमय्या म्हणाले की, “अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी. महाविकास आघाडीतील संजय राठोड गेले, अनिल देशमुख गेले आता अनिल परबही जातील. पुढे पुढे पाहा या मंत्रिमंडळातले अर्धा डझन मंत्री घरी जाणार आहेत", अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली आहे. हे देखील वाचा- अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर नवा वसुली मंत्री कोण? चित्रा वाघ यांची महाविकास आघाडी सरकारवर टीका

दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर एका मुलीच्या मृत्यूनंतर अनेक आरोप केले गेले. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांनीही राजीनामा दिला आहे. मात्र, यानंतर अनिल परब यांचा नंबर आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत. महत्वाचे म्हणजे, किरीट सोमय्या यांनी थेट अनिल परब यांचे नाव का घेतले? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी थिणगी पडण्याची शक्यता आहे.