आदित्य ठाकरे कोल्हापूर दौरा : स्वरक्षणाचे धडे देण्याच्या कार्यक्रमात स्थानिकांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

कोल्हापूरच्या शिवशाहू महाविद्यालयात 2 हजार विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे धडे देण्यासाठी आयोजित खास शिबिरामध्ये आदित्य ठाकरे धडे देताना अचानक आलेल्या वार्‍यामुळे मंडप उडाल्याने घबराट पसरली होती.

Aaditya Thackeray (Photo Credits : Twitter)

Aaditya Thackeray Kolhapur Visit  : कोल्हापूरच्या दौर्‍यावर असलेले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  आज एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. कोल्हापूरमध्ये (Kolhapur) शालेय विद्यार्थींना स्वरक्षणाचे धडे देण्याच्या एका कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. मात्र अचानक वार्‍याचा वेग वाढला आणि मंडपाचे काही थांब कोसळले, मंडप उडाला. परंतू व्यासपीठावरील सारेच उपस्थित सुरक्षित असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

कोल्हापूरच्या शिवशाहू महाविद्यालयात 2 हजार विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे धडे देण्यासाठी खास शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. आदित्य ठाकरे शिबिरामध्ये धडे देताना अचानक आलेल्या वार्‍यामुळे मंडप उडाला मात्र आदित्य ठाकरेंनी सारा प्रकार सावरत या विषयी मिश्किल अंदाजात टिप्पणी करताना हा मंडप मीच जादूने वर नेला,मला तुमची रिअ‍ॅक्शन पहायची होती असं म्हटलं.

अचानक उडालेला मंडप पाहून उपस्थित विद्यार्थिनी घाबरल्या होत्या. मात्र स्थानिकांनी आणि आयोजकांनी हा प्रकार सावरून घेतला. व्यासपीठावरील सारे सुरक्षित असून या कार्यक्रमानंतर आदित्य ठाकरे त्यांच्या पुढील कार्यक्रमाला रवाना झाले आहेत.