धरतीवर स्वर्गाची झलक – गंगटोक
हिमालयाच्या कुशीत, निसर्गाची नानाविध रूपे ल्यायलेले, बौध्द मठांच्या स्पर्शाने पावन झालेले, निसर्गसौंदर्यासाठीच नाही तर अॅडव्हेंचरस गोष्टींसाठीही प्रसिद्ध असलेले गंगटोक आडवळणावर आहे मात्र तरीही सर्व सुख सोयींनी सुसज्ज !
निरभ्र आकाश, पांढऱ्याशुभ्र कापसासारख्या बर्फाने माखलेली शिखरे, नजर फिरेल तिकडे दूरवर पसरलेल्या हिमालयाच्या पर्वतरांगा, गच्च जंगलांनी वेढलेली नागमोडी वळणे, असंख्य कोसळणाऱ्या धबधब्यांनी दुमदुमनाऱ्या खोल दऱ्या, विविध फुलांनी विखुरलेले त्यांचे असंख्य रंग आणि अंगावर गार वाऱ्याची झूल पांघरून दडपून बसलेले हे गंगटोक शहर. इथे एकदा उगवलेल्या सूर्याला मावळण्याची तमा नसावी आणि परतीच्या वाटेवर चौफेर हिमनागांवर किरणांची उधळण व्हावी, धुक्यात न्हालेले आभाळ इतके खाली की जिथे स्वर्ग दोन बोट उरावा. निसर्गाची इतकी उधळण क्वचितच कुठेतरी आढळते. स्वतःला विसरून जर का निसर्गाशी एकरूप व्हायचे असेल तर गंगटोक सारखे दुसरे शहर नाही.
हिमालयाच्या कुशीत, निसर्गाची नानाविध रूपे ल्यायलेले, बौध्द मठांच्या स्पर्शाने पावन झालेले, निसर्गसौंदर्यासाठीच नाही तर अॅडव्हेंचरस गोष्टींसाठीही प्रसिद्ध असलेले, जिथल्या नाजूक हातांनी विणले जातात अनेक हातमागाचे नमुने असे हे गंगटोक आडवळणावर आहे मात्र तरीही सर्व सुख सोयींनी सुसज्ज ! ‘सेव्हन सिस्टर्स’ मधील एक महत्वाचे राज्य सिक्कीम आणि या राज्याची राजधानी म्हणून मिरवणारे गंगटोक समुद्र सपाटीपासून १८०० मीटर उंचीवर वसलेले आहे. काश्मीरनंतरचा दुसरा स्वर्ग अशी ख्याती लाभलेल्या गंगटोकची सुंदरता डोळ्यात साठवून आणि आठवणीत बांधूनही संपत नाही. काहीतरी मागे उरतेच, म्हणूनच शांत क्षणांनी विसावलेल्या मनाची पावले परत परत गंगटोककडे वळलीत तर त्यात नवल ते कोणते.
गंगटोक शहर बागडोगरापासून १२४ किमी, एनजेपीपासून १२४ किमी, दार्जिलिंग शहरापासून ९४ किमी, तर सिलिगुडीपासून ११४ किमीवर आहे. सिक्कीम म्हणजे लिंबू भाषेत ‘देवभूमी’. ‘लिंबू’ ही नेपाळात बोलली जाणारी तिबेटो-बर्मी भाषा आहे. पश्चिम सिक्किममधील युक्सोम-नॉर्बुगँगमधल्या देवदार वृक्षराजीत वसलेल्या शांत टेकडीवर, सिक्कीमचे पहिले चोग्याल (राजे) म्हणून, फुंत्सोग नामग्याल यांचा, इसवी सन १६४२ मधे राज्याभिषेक झाला होता. तेव्हापासूनच आधुनिक सिक्कीमच्या इतिहासास सुरूवात झाली.
भेट देण्याचा उत्तम काळ -
संपूर्ण वर्षभरात गंगटोकला कधीही भेट देऊ शकता मात्र पावसाळ्यातील गंगटोक काही अवर्णणीयच तरीही साधारण फेब्रुवारी ते मे आणि सप्टेंबर ते डिसेंबर हा कालावधी गंगटोकला भेट देण्याचा उत्तम काळ. खळखळ वाहणारी तिष्ठा नदी, हिमालयन म्युझियम, तिबेटी मदत केंद, चहाचे मळे, खरेदीसाठी गजबजलेला चौरस्ता, शहरातून फिरणारी मिनी ट्रेन, प्रसन्न चेहऱ्याचे नगरवासी, या सर्व गोष्टींचा अनुभव प्रत्यक्ष गंगटोकला जाऊनच घेता येऊ शकतो.
गंगटोकला पर्वतांचे शहरही संबोधतात. इथून कांचनगंगा पर्वतराजीचा जो नजरा दिसतो तो पाहून तुम्ही स्वतःलाही हरवून जाल. गंगटोकमध्ये जागोजागी बौध्द मठ वसलेले आहेत, जगभरातील अनेक लोकांची आस्था या मठांशी जोडली गेली आहे. इथे पाहण्याबरोबरच अनेक अॅडव्हेंचरस गोष्टींदेखील करता येतात. गंगटोक शहर तसे खुपसे गजबजलेले आहे. सपाटी तशी इथे कमीच. शहराच्या मध्यभागात आणि आसपास असलेली डोंगर उतारावरची घरे आणि इमारती सोडल्या तर इतरस्र तशी शांतता असते. गंगटोकची सुंदरता इतकी पसरलेली आहे की ५-६ दिवसांत गंगटोक आणि आजुबाजुचा परिसर अनुभवने अशक्य तरीही गंगटोक मध्ये काही ‘मस्ट वॉच’ ठिकाणे आहेत जी पाहिल्याशिवाय गंगटोक पहिल्याचा फील येतच नाही. हे क्षेत्र पर्वतीय प्रदेशात वसलेले असल्याने इथे प्रवासास किती वेळ लागेल याचे गणित अंतराच्या अंदाजावरून काढता येत नाही.
तर गंगटोकचे मुख्ये आकर्षण आहे ‘ताशी व्यू पॉइंट’. तर साधारण शहरापासून ८ किमी. दूर असलेले हे ठिकाण म्हणजे संपूर्ण गंगटोक शहराला डोळ्यात आणि कॅमेरामध्ये साठवून घेण्याचे उत्तम ठिकाण होय. इथून संपूर्ण गंगटोक शहराचा जो नजरा दिसतो त्याला तोड नाही. इथूनच बर्फाच्छादित कांचनगंगाचे विहंगम दृश्यही दिसते.
साधारण ७ किमी. शहरापासून दूर, डोंगराच्या कुशीत ‘गणेश टोक’ हे ठिकाण आहे. इथे गणेशाचे अष्टकोनी प्राचीन मंदिर आहे तर ‘हनुमान टोका’वर हनुमानाचे. या मंदिरांत बुद्धांच्या अनेक अनुयायांचीही ये जा होत असते. समोरच्या मोकळ्या जागेत पारंपारिक सिक्किमी आणि तिबेटी कपडे घालून फोटो काढता येतात. इथूनही संपूर्ण गंगटोक शहर नजरेखालून घालता येते. इथून दिसारणाऱ्या दऱ्या अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडतात.
सोमगो तलाव शहरापासून साधारण ५० किमी वर आहे. चहूबाजूंनी बर्फाने वेढलेला हा तलाव साधारण एप्रिल मध्ये पूर्णतः बर्फामध्ये रुपांतरीत होतो. हिवाळ्यामध्ये या तलावाजवळ अनेक विदेशी पक्ष्यांचे आगमन होते. अजून थोडे पुढे लाम्पोखरी तलाव आहे. तोही असाच बर्फाने माखलेला. हिमालयाची विविध रूपे इथून पाहायला मिळतात. क्षणोक्षणी रंग बदलणारे आकाश, क्षणोक्षणी संग बदलणारे वातावरण आणि कमालीच्या स्वच्छ, आरस्पानी पाण्यावर उमटणारी छाया-प्रकाशाची क्षणचित्रे याची मजा इथे अनुभवता येते.
गंगटोक मध्ये जागोजागी अनेक मठ पाहायला मिळतात, मात्र रुमटेक मठ पाहिल्याशिवाय गंगटोकची सहल पूर्ण होऊच शकत नाही. साधारण ३०० वर्षे जुना असलेला हा मठ मुख्य शहरापासून २५ किमी अंतरावर आहे. या मठात रोज सकाळी बौध्द भूक्षुंद्वारे प्रार्थना होते, जी चुकवून चालणार नाही. या मठात विद्यालय आहे, ध्यान धारणेसाठी विविध कक्ष आहेत. या मठात बहुमुल्य असे थंगा पेंटिग तसेच बौद्ध धर्माच्या कग्यूपा संप्रदायाशी संबंधित अनेक गोष्टी जतन करून ठेवल्या आहेत.
दो द्रूल चोर्टेन, गंगटोकच्या मुख्य आकर्षनापैकी एक असलेले हे ठिकाण. १९४५ मध्ये स्थापना झालेला हा सिक्कीममधील सर्वात महत्वाचा स्तूप आहे. १०८ प्रार्थना चक्रांनी सजलेल्या या मठाचे शिखर सोन्याचे आहे.
ऑर्किड अभयारण्य, ज्या लोकांना नैसर्गिक सौंदर्याची आवड त्यांनी या ठिकाणाला जरूर भेट द्यावी. विविध पसरलेल्या ऑर्किडच्या रंगांमध्ये तुम्ही खरच स्वतःला हरवून जाल. इथे एक नाही दोन नाही तर सिक्कीममध्ये आढळणारे तब्बल ४५४ जातींचे ऑर्किड पाहायला मिळतात.
रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ टिबटोलॉजी- विज्ञान, चिकित्सा, ज्योतिष अशा अनेक विषयांची अनेक पुस्तके इथल्या भवनात पाहायला मिळतात. तिबेटचा इतिहास आणि संस्कृती इथल्या अनेक गोष्टींतून उलगडत जाते. हा भवन इथल्या हस्तशिल्पकेलेसाठेही खूप प्रसिद्ध आहे. हातमागावर लोकरी वस्त्रे विणण्याचे तसेच लाकडावर कोरीव काम करण्याचे प्रशिक्षणही इथे दिले जाते.
बाबा मंदिर – १९६० मध्ये शहीद झालेल्या एका जवानाच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे मंदिर अथवा स्मारक बांधलेले आहे. हा जवान आजही सैनिकांच्या स्वप्नात येऊन येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना देते असे इथल्या लोकांचे मानने आहे.
बनझांकरी धबधबा – गंगटोक मधील अजून एक पाहण्यासारखे ठिकाण. पर्वतावरून उसळणाऱ्या पाण्याचे असे दृश्य तुम्हाला फार कमी ठिकाणी पाहायला मिळेल. हा स्पॉट फोटोशूटसाठीही अतिशय उत्तम आहे. नवपरिणीत जोडप्याने या ठिकाणाला नक्कीच भेट द्यावी.
फिरता फिरता दमलात तर विसाव्याला अनेक मॉनेस्ट्री गंगटोकमध्ये आहेत, त्यापैकीच एक जोरगाँग मॉनेस्ट्री. आकाराने लहान असली तरी प्रथम दर्शनी 'रुप मनोहर' उठुन दिसते. आकर्षक रंगसंगतींमध्ये सजवलेल्या दारं-खिडक्या आणि कमानी हे तिबेटियन संस्कृतीत सर्वत्र दिसते. आतमध्ये खेंपो बोधीसत्व, गुरु पद्मसंभव आणि चोग्याल त्रायसाँग यांच्या मुर्ती आहेत. तिबेटचे १४ वे दलाई लामा यांनी खुद्द २१ वर्षांपुर्वी या मॉनेस्ट्रीची मुहुर्तमेढ रोवली होती.
अनेक लोकांना पर्यटनामध्ये पाहण्यासोबत अनेक साहसी गोष्टीही करण्याची हौस असते, आणि त्यासाठी गंगटोक सारखे दुसरे ठिकाण सापडणार नाही. इथे तुम्ही राफ्टींग, ट्रेकिंग, विविध राईड, यार्क सफारी, माऊंटन बाइकिंग अशा अनेक गोष्टी करू शकता. यातीलच एक महत्वाचे आकर्षण म्हणजे रज्जुमार्ग उर्ग रोप-वे. या रोप वे मधून संपूर्ण गंगटोक एका नजरेच्या टप्प्यात येते. शहरासोबतच बर्फाची शिखरे, खोल दऱ्या, आभाळाला भिडणारे वृक्षही तुम्ही आकाशातून पाहू शकता.
गंगटोकमध्ये खरेदी -
गंगटोकला आला आहेत आणि काही शॉपिंग न करता परत जाऊ असे कधी होणारच नाही, कारण इथे तुमच्या दिमतीला आहे एम.जी.रोड हा दुतर्फा १००-१५० दुकाने असलेला गंगटोक मधला शॉपिंग स्ट्रीट. इथल्या मार्केट मध्ये विविध तिबेटी वस्तू, हातमागावरील कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, काचेच्या विवध वस्तू अशा एक ना अनेक गोष्टी मिळतात. काही खरेदी करायची नसेल तरी संध्याकाळी उगाचच फिरायला हा एक मस्त स्पॉट आहे.
अशा डोंगर-उतारांवर वसलेल्या गंगटोक शहरात, मोठी सपाट अशी जाग मिळणे दुरापास्त आहे. तरीही ज्या काही मोजक्या जागी अशी प्रशस्त ठिकाणे सापडतात, त्या आहेत महात्मा गांधी मार्ग, पाल्जोर स्टेडियम आणि बुद्ध मठ. इथल्या कांचनगंगा पर्वतराजीच्या कुशीतील 'क्वीन ऑफ हिल्स' पाहून मन प्रसन्न होते. पहाटे चार वाजता कडक थंडीत झोपेतून उठून 'टायगर पॉईंट'वरून सनराईज पहाणे एक नयनरम्य सोहळा तुम्ही अनुभवू शकता. बर्फाच्छादीत पर्वत शिखरांवर जणू सुवर्णाचा अभिषेक होतो आहे, असे वाटते.
कसे पोहोचाल -
गंगटोकसाठी जवळचे विमानतळ बागडोगरा हे आहे. बागडोगरावरून गंगटोकला जाण्यासाठी बस सेवा अथवा टॅक्सीसेवा देखील उपलब्ध आहे. सिलीगुडी हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे, तिथूनही गंगटोकसाठी अनेक वाहने उपलब्ध आहेत. इथे फिरण्यासाठी मुख्यतः लोकल ट्रान्सपोर्ट म्हणून टॅक्सीचा वापर केला जातो.
तर या हिमायालाच्या कुशीत वसलेल्या, बर्फाने वेढलेल्या, अनेक वृक्षांनी सजलेल्या गंगटोकला तुम्ही कधी भेट देताय?