Hydroxychloroquine and Coronavirus: सुरक्षेच्या कारणास्तव WHO ने थांबवली हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची कोरोना व्हायरस उपचारातील चाचणी

बर्‍याच देशांनी कोरोना संक्रमित रूग्णांसाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची (Hydroxychloroquine) वापर सुरु केला आहे,

Medicine |Image Used For Representative Purpose (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, अनेक देश याबाबतचे औषध शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. बर्‍याच देशांनी कोरोना संक्रमित रूग्णांसाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची (Hydroxychloroquine) वापर सुरु केला आहे, तर काही ठिकाणी यावर बंदी घातली आहे. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या वापरावर बंदी घातली आहे. डब्ल्यूएचओने सुरक्षेच्या कारणास्तव कोरोना व्हायरसच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या, मलेरिया ड्रग हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची चाचणी थांबविली आहे. वृत्तसंस्था एएफपीने ही बातमी दिली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सोमवारी सांगितले की, खबरदारी म्हणून कोरोना विषाणूच्या उपचारांसाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची क्लिनिकल चाचणी तात्पुरती बंद केली आहे.

या निर्णयाची घोषणा डब्ल्यूएचओचे महासंचालक Dr. Tedros Adhanom Ghebreyesus यांनी केली. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे एक एंटी-मलेरिया औषध आहे, ज्याची कोविड-19 संक्रमण होण्यापासून वाचण्यासाठी प्रोफेलेक्टिक उपचार म्हणून चाचणी घेण्यात आली आहे. मोठ्या निरीक्षणाच्या अभ्यासानुसार, अँटीबायोटिक अझिथ्रोमाइसिनबरोबर किंवा त्याशिवाय एन्टीमलेरियल ड्रग हायड्रोक्सीक्लोरोक्विनचा, कोविड-19 च्या उपचारात रूग्णांना कोणताही फायदा होत नसल्याचे दिसून आले होते.

याबाबत बोलताना, Tedros म्हणाले, ‘एक्झिक्युटिव्ह गटाने सॉलिडॅरिटी चाचणीमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वाइनला तात्पुरता विराम दिला आहे. डेटा सुरक्षा मॉनिटरींग बोर्डाद्वारे याच्या सुरक्षा डेटाचा आढावा घेण्यात आला आहे. मात्र चाचणीसंबंधी इतर गोष्टी चालू राहणार आहेत.’ नुकतेच द लान्सेट या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात, कोविड-19 च्या जवळपास 15,000 रूग्णांच्या डेटाचे विश्लेषण केले गेले आहे, ज्यांना क्लोरोक्वाइन किंवा त्याचे अ‍ॅनालॉग हायड्रोक्सीक्लोरोक्विन दिले आहे. या औषधामुळे रुग्णांच्या हृदयाच्या समस्या वाढल्या तर काही ठिकाणी मृत्युदरही वाढलेला दिसून आला. (हेही वाचा: कोरोना व्हायरस संक्रमित व्यक्ती 11 दिवसांनतर दुसऱ्यांना संसर्ग देऊ शकत नाही; NCID च्या शास्त्रज्ञांचा दावा)

यापूर्वी डब्ल्यूएचओचे कार्यकारी संचालक डॉ. मायकेल रायन म्हणाले होते की, 'प्रत्येक सार्वभौम राष्ट्र नागरिकांना कोणत्याही औषधाच्या वापराबद्दल सल्ला देऊ शकेल. यात हायड्रोक्सीक्लोरोक्विन आणि क्लोरोक्विन आधीपासून परवानाधारक उत्पादने आहेत. परंतु अद्यापपर्यंत हे औषध कोरोना व्हायरसच्या उपचारामध्ये प्रभावी असल्याचे दिसून आले नाही.’ या औषधाच्या संभाव्य दुष्परिणामांबद्दल बर्‍याच अधिकार्‍यांकडून इशारे देण्यात आले आहेत. बर्‍याच देशांनी रुग्णालयात क्लिनिकच्या देखरेखीखाली हे औषध क्लिनिकल चाचण्यापुरते मर्यादित ठेवले आहे.