Monkeypox Outbreak: मंकीपॉक्सच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे; जाणून घ्या सविस्तर
डब्ल्यूएचओने सांगितले आहे की, तेव्हापासून हा आजार जगातील 20 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. त्यात 300 पुष्टी झालेली आणि संशयास्पद प्रकरणे आहेत.
देशात मंकीपॉक्सच्या (Monkeypox) व्यवस्थापनाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आजपर्यंत भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही परंतु काळजी घेणे गरजेचे आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीचे निरीक्षण केले जाईल. संसर्गजन्य कालावधीत रुग्ण किंवा त्यांच्या दूषित गोष्टींशी शेवटचा संपर्क झाल्यानंतर 21 दिवसांच्या कालावधीसाठी दररोज व्यवस्थित लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
वेगवेगळ्या देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे वाढत आहेत. मांकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेता, भारतीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मात्र, आत्तापर्यंत भारतात या आजाराचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. असे असतानाही सरकार खबरदारी घेत आहे. या आजाराबद्दल किंवा त्याच्या लक्षणांबद्दल कोणताही गैरसमज होऊ नये, म्हणून मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तसेच, देशात एखादा रुग्ण आढळलाच तर परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळता येईल.
मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लॅबमध्ये चाचणी केल्यानंतरच मंकीपॉक्सचे प्रकरणाची पुष्टी केली जाईल. यासाठी केवळ पीसीआर किंवा डीएनए चाचणीची पद्धत वैध असेल. कोणतेही संशयास्पद प्रकरण समोर आल्यास, त्याचा नमुना राज्ये आणि जिल्ह्यांमधील एकात्मिक रोग निगराणी कार्यक्रमाच्या नेटवर्कद्वारे पुण्यातील ICMR-NIV च्या उच्च प्रयोगशाळेत पाठविला जाईल. त्याच वेळी, सर्व व्यवस्था एपिडेमियोलॉजी अंतर्गत करायच्या आहेत. यामध्ये, आजारी रुग्ण आणि त्यांची काळजी, निदान, केस मॅनेजमेंट आणि जोखीम घटकांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मंकीपॉक्सची लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. (हेही वाचा: 20 देशांमध्ये पोहोचला मंकीपॉक्स विषाणू, 200 प्रकरणांची पुष्टी; WHO ने जारी केलेले निवेदन)
या आजाराचा प्रादुर्भाव मे महिन्याच्या सुरुवातीला झाला. डब्ल्यूएचओने सांगितले आहे की, तेव्हापासून हा आजार जगातील 20 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. त्यात 300 पुष्टी झालेली आणि संशयास्पद प्रकरणे आहेत. मंकीपॉक्सचा अचानक उद्रेक आणि त्याचा प्रसार जगासाठी धोक्याची घंटा आहे, कारण तो व्यक्तीच्या संपर्कातूनही पसरतो.