Lab grown Blood to Humans: प्रथमच मानवी शरीरात चढवण्यात आले प्रयोगशाळेत विकसित केलेले रक्त; निकालांवर लागले संपूर्ण जगाचे लक्ष

पुढे, शास्त्रज्ञ किमान 10 निरोगी स्वयंसेवकांमध्ये या रक्ताची चाचणी करण्याची तयारी करत आहेत. या लोकांना पाच ते दहा मिलीलीटर रक्त दिले जाईल.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात रक्त (Blood) ही एक मौल्यवान गोष्ट आहे. अजूनही जगात रक्ताच्या उपलब्धतेची पुरेशी व्यवस्था झालेली नाही. जगातील इतर देशांप्रमाणेच भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातही निरोगी लोकांच्या रक्ताची सतत गरज भासते, जेणेकरून गरजूंचे प्राण वाचू शकतील. आता हा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. यूकेमध्ये (UK) जगात प्रथमच प्रयोगशाळेत तयार केलेले रक्त (Lab-Grown Blood) लोकांना दिले गेले आहे. यूकेमध्ये क्लिनिकल चाचणी अंतर्गत, प्रयोगशाळेत वाढलेले रक्त लोकांमध्ये चढवले गेले.

या प्रयोगानंतर ब्रिटनच्या संशोधकांनी आणि शास्त्रज्ञांनी सांगितले की, 'हे प्रयोगशाळेत वाढलेले रक्त शरीराच्या आत कसे कार्य करते हे शोधण्यासाठी ते मानवी शरीरात अतिशय कमी प्रमाणात संक्रमित केले गेले आहे.’ या क्लिनिकल चाचणीचे परिणाम थॅलेसेमिया आणि अॅनिमियासारख्या आजारांवर विजय मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. अशा आजारांनी ग्रस्त लोकांना नियमित रक्तदात्यांवर अवलंबून राहावे लागते.

'बीबीसी'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या संशोधनाचे अंतिम उद्दिष्ट दुर्मिळ रक्तगटाचे वापरता येण्याजोगे रक्त विकसित करणे हे आहे. दुर्मिळ रक्तगटाचे रक्त शोधणे कठीण असते, जे वेळेवर मिळाले नाही तर अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात. सिकल सेल अॅनिमिया सारख्या परिस्थितीमध्ये नियमित रक्त संक्रमणावर अवलंबून असलेल्या लोकांसाठी हे अत्यंत महत्वाचे आहे. कारण रक्ताचा नमुना बरोबर जुळला नाही तर रुग्णाचे शरीर ते रक्त नाकारू लागते आणि उपचार यशस्वी होत नाहीत.

टिश्यू मॅचिंगची ही पातळी ए, बी, एबी आणि ओ रक्तगटांपेक्षा वेगळी आहे. क्लिनिकल चाचणीत सहभागी असलेल्या ब्रिस्टल विद्यापीठातील प्रोफेसर ऍशले टोये म्हणाले की, जगात काही रक्त गट दुर्मिळ आहेत आणि युकेमध्ये असे रक्तगट असणारे फक्त 10 लोक आहेत. अहवालानुसार, सध्या भारतात प्रथमच ओळखल्या गेलेल्या 'बॉम्बे' रक्तगटाचे फक्त तीन युनिट रक्त उपलब्ध आहे. असे दुर्मिळ रक्तगटाचे रक्त उपलब्ध करण्यासाठी प्रयोगशाळेत प्रयोग केले जात आहेत. (हेही वाचा: Covaxin Doses: 2023 च्या सुरुवातीला Expire होणार कोवॅक्सिनचे 50 दशलक्ष डोस)

या रक्ताच्या पहिल्या व प्राथमिक चाचणीत दोन जणांनी सहभाग घेतला आहे. पुढे, शास्त्रज्ञ किमान 10 निरोगी स्वयंसेवकांमध्ये या रक्ताची चाचणी करण्याची तयारी करत आहेत. या लोकांना पाच ते दहा मिलीलीटर रक्त दिले जाईल. या चाचणीत सहभागी झालेल्या लोकांना किमान चार महिन्यांच्या अंतराने दोनदा रक्त संक्रमण केले जाईल. एकाला सामान्य रक्त असेल आणि दुसऱ्याला प्रयोगशाळेत विकसित झालेले रक्त चढवले जाईल. शास्त्रज्ञांना आशा आहे की प्रयोगशाळेत वाढलेले रक्त सामान्य रक्तापेक्षा खूप शक्तिशाली असेल.