Tulsi Vivah 2019: तुळशीचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

तुळशीचे मानवी शरीराला अनेक फायदे होतात. तुळशीतील औषधी गुणांमुळे तुळशीचा समावेश औषधी वनस्पतींमध्ये करण्यात येतो.

Health Benefits Tulsi (PC - Twitter)

Tulsi Vivah 2019: हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीचे अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे हिंदू धर्मातील प्रत्येकाच्या घरी तुळशीचे रोप लावले जाते. तसेच त्याची दररोज पुजा केली जाते. सकाळी अंघोळ केल्यानंतर घरातील महिला तुळशीला पाणी घालून तुळशी वृंदावनाला परिक्रमा घालतात. अनेकदा आपल्या घरातील वृद्ध व्यक्ती घरात तुळस लावण्याचा सल्ला देतात. तुळशीला धार्मिक महत्त्वाबरोबरचं वैज्ञानिक महत्त्वही आहे. तुळशीचे मानवी शरीराला अनेक फायदे होतात. तुळशीतील औषधी गुणांमुळे तुळशीचा समावेश औषधी वनस्पतींमध्ये करण्यात येतो. तुळशीच्या सेवनाने शरीरात सकारात्मक उर्जा प्रवाहीत होते. तुळशीची पाने, मुळे, फुले, फांदया, मंजीरी आणि खोडाचा वापर वेगवेगळया आजारावर औषधी म्हणून करता येतो. त्यामुळे तुळस ही अगदी मुळापासून ते फुलांपर्यंत मानवी शरीरासाठी फायदेशीर ठरते. चला तर मग 'लेटेस्ट ली'च्या या खास लेखातून तुळशीचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात...(हेही वाचा - Tulsi Vivah 2019: तुळशी विवाह करताना 'या' गोष्टी केल्यास वैवाहिक जीवनातील समस्या होतील दूर)

तुळशीला 'औषधाची राणी' असं संबोधलं जातं. तुळशीच्या सेवनामुळे अगदी कर्करोगासारखे दुर्धर रोग ते सर्दी-खोकल्यासारखे सर्वसाधारण आजार बरे होतात. त्यामुळे अनेक शतकापासून तुळशीचा वापर केला जातो. भारतीय संस्कृतीत वृक्ष, झाडे, वनस्पती यांना आरोग्यात असलेले मोठे स्थान ऋषीमुनींपासून अधोरेखित केले गेले आहे. निसर्गात वाढणाऱ्या विविध वनस्पती आरोग्य राखण्यात उपयोगाच्या ठरतात हे आयुर्वेद तसेच शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - Tulsi Vivah 2019: तुळशी विवाह करताना ‘या’ गोष्टी केल्यास होईल भरपूर धनलाभ

तुळशीचे आरोग्यदायी फायदे -

तोंडाचे स्वास्थ्य टिकवण्यास मदत –

तोंडाचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी तुळशीचे सेवन करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. दातांची वेदना, मुखदुर्गंधी, चव नसणे, तोंड कोरडे पडणे आदी समस्यांवर तुळस पाने चावून खाल्ल्यास आराम मिळतो. तुळशीची पाने खाणे हे मुखशुध्दीसाठी उत्तम उपाय मानला जातो. पूर्वीच्या काळात भोजनानंतर तुळसपानांचा स्वाद मुखशुध्दीसाठी केला जात असे. तोंडातील सूज व फोड तूळस खाल्ल्याने बरे होतात. तोंडाच्या कर्करोगासाठी तुळशीची पाने खाणे लाभदायक ठरते.

डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत –

डोळयांमध्ये संक्रमण झाल्यास त्यांना तुळशीच्या पानांनी धुतल्यास डोळ्यातील संक्रमण बरे होते. डोळयांना सुज आल्यास तुळशीच्या तेलाचे दोन ते तीन थेंब टाका. असं केल्यास तुमच्या डोळ्यांची सुज कमी होते. डोळ्यांतील विविध व्याधींसाठी वापरल्या जाणाऱ्या आयुर्वेदिक ड्रॉपमध्ये तुळसतेलाचा वापर केला जातो.

दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर -

दातांच्या आरोग्यासाठी तुळशीचे सेवन करणे फायदेशीर ठरते. हिरडया कमजोर होणे, दातातून रक्त येणे, दात कमजोर होणे, दात सडणे, या सर्वांवर तुळशीची पाने खाणे फायदेशीर ठरतं.

ताप आल्यास रामबाण उपाय -

तुळशीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिजैविक आणि वेदनानाशक गुणधर्म असतात. त्यामुळे ताप आल्यावर तुळशीच्या पानांचा रस प्यावा. असे केल्यास अगदी थोड्यावेळात ताप कमी होतो. तसेच तुळशीच्या पानांचा काढाही ताप कमी करण्यास फायदेशीर ठरतो. लहान मुलांना ताप आल्यावर तुळशीच्या तेलाने मालिश करावी. त्यामुळे अगदी कमी वेळेत ताप थंड होतो.

त्वचेची काळजी -

तुळशीमध्ये जीवनसत्वे 'अ' आणि 'ब' मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेवर खाज सुटणे तसेच त्वचेसंबंधी इतर समस्यांवर तुळशीच्या पानांचा उपयोग होतो. तुळशीचे पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्याने त्वचा तजेदार आणि टवटवीत होते. तुळशीच्या पानांचा उपयोग चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठीही होतो.

डोकेदुखी –

डोके दुखणे, नाकाच्या हाडाच्या वाढीमुळे डोके दुखणे, सर्दी कफ, उच्च रक्तदाबामुळे डोकेदुखी झाल्यास तुळसपानांचा लेप लावल्यास डोकेदुखी बरी होते. तुळस तेलाने डोक्याची व कपाळाची मालीश केल्यास लवकर आराम मिळतो. तुळशीतील कॅम्फेन, किनोल, यूग्नोल, कार्वक्रोल आणि मिथाईल चाविकोल या औषधीय घटकांमुळे डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.

मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत -

तुळशीमध्ये इगेनॉल द्रव्य असते. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण राहण्यास मदत होते. दररोज सकाळी तुळशीची पाने खाल्ल्याने किंवा तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत -

आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास तुळस फायदेशीर ठरते. तुळशीमध्ये असणाऱ्या विविध गुणधर्णामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती, प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते.

अशाप्रकारे तुळशीचे सेवन केल्याचे विविध फायदे आहेत. कोणत्याही आजारावर आयुर्वेदिक उपचार करणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे पुन्हा तो आजार उद्भवण्याची संभावना कमी होते. (सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. हे उपाय करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)