Antibiotic Resistance: सतत अँटिबायोटिक्स घेणाऱ्यांनो सावध व्हा! येत्या 25 वर्षात होऊ शकतो जवळपास 4 कोटी लोकांचा मृत्यू- Reports

याला प्रतिजैविक प्रतिरोधक म्हणतात. जगभरातील शास्त्रज्ञ आणि सरकारे चेतावणी देत ​​आहेत की, प्रतिजैविक प्रतिकार हे पुढील मोठे आरोग्य संकट बनत आहे.

Medicine |Image Used For Representative Purpose (Photo Credits: Pixabay)

Antibiotic Resistance: अँटिबायोटिक्सचा (Antibiotic) शोध हा वैद्यकविश्वातील सर्वात क्रांतिकारक शोध मानला जातो. साधारण 1928 मध्ये अँटिबायोटिक्सचा शोध लागला. ज्या काळी किरकोळ दुखापतही माणसासाठी जीवघेणी ठरू शकत होती, तेव्हा अँटिबायोटिक्स हे एक वरदान ठरले. त्यानंतर काही काळातच, अँटिबायोटिक्स म्हणजेच प्रतिजैविक हे जवळजवळ प्रत्येक जखमेवर आणि प्रत्येक रोगावर औषध बनले. त्याच्या शोधामुळे संक्रमणामुळे होणारे मृत्यू 50% वरून 10-15% पर्यंत कमी झाले. पण आता ही औषधे जगासमोर आरोग्याचे आव्हान उभे करत आहेत.

आजच्या काळात क्वचितच असा कोणी असेल जो, कोणत्याही छोट्या-मोठ्या आजारासाठी औषध घेत नसेल. आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी औषधे महत्वाची भूमिका बजावतात, परंतु जास्त औषधे घेतल्याने त्याचे तोटे देखील आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये ओव्हर द काउंटर प्रतिजैविकांचा वापर लक्षणीय वाढला आहे. कोणताही संसर्ग, विषाणूजन्य ताप, खोकला, सर्दी झाल्यास लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक्स वापरण्यास सुरुवात करतात, परंतु ही सवय एक मोठी समस्या बनत आहे. कारण सतत अँटिबायोटिक्स घेतल्याने अँटिबायोटिक्स रेझिस्टन्स निर्माण होतो. म्हणजेच या अँटिबायोटिक्सचा शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. (हेही वाचा: Bill Gates: भारतात कुपोषित बालकांच्या संख्येत घट; मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्सकडून कौतुक)

अहवालानुसार, 2050 सालापर्यंत जगातील सुमारे 3.90 कोटी लोक प्रतिजैविक प्रतिरोधकतेमुळे मृत्युमुखी पडू शकतात. लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका नव्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, 2022 ते 2050 पर्यंत प्रतिजैविक प्रतिकार (AMR) मुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 70% वाढू शकते व याचा वृद्धांना सर्वाधिक धोका असेल. सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे 2050 पर्यंत प्रतिजैविक प्रतिकारामुळे 1.18 कोटी मृत्यू केवळ दक्षिण आशियामध्येच होतील, ज्यात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका यांचा समावेश आहे.

जगभरातील अशा प्रकारचा हा पहिला अभ्यास आहे. डब्ल्यूएचओ म्हणते की या प्रतिकारामुळे सामान्य संक्रमणांवर उपचार करणे समस्याप्रधान बनते. या अभ्यासात असे आढळून आले आहे की 1990 ते 2021 दरम्यान, प्रतिवर्षी 1 दशलक्षाहून अधिक लोक प्रतिजैविक प्रतिकारामुळे मरण पावले आहेत, जे भविष्यात आणखी वाढतील. यावर उपाय म्हणजे अँटिबायोटिक्समध्ये बदल करणे आणि दुसरा मार्ग म्हणजे नवीन औषधे विकसित करणे. परंतु दोन्ही पर्यायांमध्ये कोणतीही लक्षणीय प्रगती दिसून येत नाही.