Dussehra 2019: दसरा दिवशी आपट्याची पानं 'सोन्याच्या' स्वरूपात का वाटतात?

महाराष्ट्रात दसर्‍या दिवशी सोन्याचं पान म्हणून 'आपट्याची पानं' (Apta Leaves) वाटण्याची प्रथा आहे. दसर्‍याला आपट्याची पानं एकामेकांना देण्याच्या प्रथेमागे अनेक पौराणिक दाखले आहेत.

Apta leaf (Photo Credits: Wikimedia Commons/ Flickr, Dinesh Valke)

भारतीय सणांमधून आपल्या संस्कृतीचं देखील दर्शन होतं त्यामुळे लहानपणापासून संस्कारांचा एक भाग म्हणून काही गोष्टी करणं हा अनेकांसाठी सवयीचा भाग बनून गेला आहे. दसरा (Dussehra) किंवा विजयादशमी (Vijaya Dashami) हा सण यंदा 8 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. शारदीय नवरात्रीची सांगता दसरा या सणाने होते. देशभरात विविध स्वरूपात दसरा साजरा केला जातो. महाराष्ट्रात दसर्‍या दिवशी सोन्याचं पान म्हणून 'आपट्याची पानं' (Apta Leaves) वाटण्याची प्रथा आहे. दसर्‍याला आपट्याची पानं एकामेकांना देण्याच्या प्रथेमागे अनेक पौराणिक दाखले आहेत. Dussehra 2019 Date: यंदा दसरा, विजयादशमी कधी साजरी केली जाणार? पहा पूजा विधीचे शुभ मुहूर्त

कौत्स हा वरतंतु ऋषींचा शिष्य होता. या कौत्साने गुरुकुल पद्धतीने ज्ञान संपादन केले. गुरूला दक्षिणा घेण्याच्या वेळेस शिष्याच्या प्रगतीवरच समाधान मानणाऱ्या वरतंतु ऋषींनी त्याला नकार दिला. मात्र कौत्साच्या आग्रहाखातर त्यांनी सांगितले की मला एकाच स्रोताकडून मिळालेल्या 14 कोटी सुवर्णमुद्रा अर्पण कर. कौत्साने रघुराजापुढे हात पसरले पण त्याने नुकतीच सर्व संपत्ती यज्ञात दान केली होती. मात्र दारी आलेला याचक रिकाम्या हाती पाठवणे योग्य न वाटल्याने पराक्रमी रघुराजाने कौत्साकडे काही वेळ मागितला.त्याने कुबेरावर हल्ला करून संपत्ती मिळवायची आणि दान करायची अशी शक्कल लढवली. पण या गोष्टीची खबर लागताच कुबेराने राजाला सांगितले की तीन दिवसांत तो स्वखुशीने ही मागणी मान्य करेल आणि कौत्साला सुवर्णमुद्रा मिळतील. विजयादशमीच्या अर्थात दसऱ्याच्या दिवशी जंगलात कौत्स आपटय़ाच्या झाडाजवळ असतानाच त्या झाडावर सुवर्णमुद्रांचा खच पडला. आनंदाने कौत्साने विनंती केल्यावर त्याच्या गुरुदेवांनी 14 कोटी मुद्रा घेतल्या तरीही असंख्य मुद्रा पानोपानी शिल्लक राहिल्या होत्या. गुरुदक्षिणा दिल्याच्या समाधानात कौत्साने गुरूंच्या आदेशावरून बाकी मुद्रा पानांसकटच झाडावरून तोडून इतरांना वाटल्या. म्हणून आजही दसर्‍याच्या दिवशी सोन्याच्या रूपात आपट्याची पानं वाटण्याची प्रथा कायम आहे.

पुराणातील कथेनुसार प्रभु रामाचंद्र 12 वर्ष वनवासात जाण्यापूर्वी त्यांनी शमीच्या झाडांमध्ये आपली शस्त्र ठेवली होती. दसरा हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस असल्याने अनेकजण या दिवशी हमखास सोनं खरेदी करतात. या दिवशी शुभ कार्याची सुरूवात करताना कोणताही विशिष्ट मुहूर्त बघण्याची गरज नसते.