Muharram 2019: भारतात उद्यापासून होणार हिजरी नवीन वर्षाची सुरुवात; जाणून घ्या या दुःखद पर्वाचे महत्व
उद्यापासून पाकिस्तान (Pakistan), भारत (India), श्रीलंका आणि बांगलादेश या देशांमध्ये सूर्यास्तानंतर मुहर्रम उत्सवाची सुरुवात होणार आहे.
इस्लामिक चंद्र दिनदर्शिकेचा (Islamic Lunar Calendar) पहिला महिना, मुहर्रम (Muharram) चंद्रकोर दर्शनासह जगातील बर्याच भागात सुरू झाला आहे. चंद्राच्या दर्शनासह, नवीन हिजरी वर्ष (Hijri Year) - 1441 चा भारतीय उपखंडातील देश सोडून, इतर बहुतेक इस्लामिक राष्ट्रांमध्ये प्रारंभ झाला. उद्यापासून पाकिस्तान (Pakistan), भारत (India), श्रीलंका आणि बांगलादेश या देशांमध्ये सूर्यास्तानंतर मुहर्रम उत्सवाची सुरुवात होणार आहे. मुहर्रम हा मुस्लिम बांधवांसाठी एक शुभ काळ मानला जातो.
या महिन्यातील अनेक दिवस, विशेषत: 10 व्या तारखेला जेव्हा आशुरा (Ashura) पाळला जातो तेव्हा काही लोक उपवास धरून उपासना करतात. यावर्षी, आशुरा 9 सप्टेंबर रोजी भारतीय उपखंड वगळता सौदी अरेबिया, युएई, इराण आणि जगाच्या इतर भागात पाळता जाईल. मोहरम कर्बालाच्या युद्धाचे प्रतिक आहे, जे इराकमध्ये लढले गेले होते. आजही कर्बाला इराक मधील एक प्रमुख शहर म्हणून ओळखले जाते. मोहरम याचा अर्थ ‘निषिद्ध, धिक्कार करण्यासारखा’ असा आहे.
या युद्धामध्ये इमाम हुसैनची हत्या करण्यात आली होती. हुसैन हे अल्लाहचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची मुलगी फातिमा हिचा तो मुलगा होता. शिया लोक सुतकाचे दिवस म्हणून हा दिवस पाळतात, कारण इमाम हुसैन हे आशूरेच्या दिवशी यजीद मुवावियाकडून हुतात्मे झाले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रणेते महात्मा गांधी यांनीही इमाम हुसेन यांच्या संघर्षातून प्रेरणा घेतली होती. ते म्हणाले होते, 'छळ होत असताना विजय कसा मिळवायचा हे मी हुसैनकडून शिकलो.' (हेही वाचा: मोहरम का आणि कसा साजरा केला जातो )
मुहर्रमच्या दिवशी ताबूत बनविण्याचा प्रघात चौदाव्या शतकात विदेशी आक्रमक लंगडा अमीर तैमूरलंगने सुरू केला. शेवटच्या दिवशी सर्व ताबूतांची मिरवणूक काढतात. हा ताबूत प्रकार फक्त भारत, पर्शिया व इजिप्तमध्ये पाळतात. मोहरम हा आनंदाचा सण नसून दु:खाचा दिवस आहे. या दिवशी हसेन आणि हुसैन यांचे बलिदान उजागर केले जाते. शिया समुदायातील लोक 10 दिवस काळे कपडे घालतात.