Guru Nanak Jayanti 2018 : भारतासह जगभरात 3 दिवस साजरा केला जातो खास गुरुपर्व उत्सव !
मात्र हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक पौर्णिमेला गुरुनानक जयंती साजरी केली जाते.
Guru Nanak Jayanti 2018 : गुरुनानक जयंती हा शीख धर्मियांचा पवित्र उत्सव म्हणून साजरा केला जातो. गुरुनानक जयंती (Guru Nanak Jayanti ) म्हणजे गुरु नानक यांचा जन्म दिवस. शीख धर्माच्या दहा गुरूंपैकी पहिले शीख गुरु म्हणजे गुरु नानक. शीख धर्मीय उत्साहाने साऱ्या गुरूंचा जन्मदिन साजरा करतात. या उत्सवाला' गुरुपर्व' (GuruParv) असेही म्हटले जाते. गुरुनानकांची जयंती 'गुरुपूरब'(Gurpurab)म्हणून देखील ओळखली जाते. हा दिवस गुरु नानक प्रकाश उत्सव म्हणून साजरा केला जातो. यंदा 22 आणि 23 नोव्हेंबरला गुरुनानक जयंती साजरी केली जाणार आहे. यंदाचं गुरुनानक जयंतीचे हे 549 वे वर्ष आहे.
गुरुनानक जयंती कशी आणि कोठे साजरी केली जाते ?
गुरु नानक यांचा जन्म 15 एप्रिल 1469 साली झाला. मात्र हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक पौर्णिमेला गुरुनानक जयंती साजरी केली जाते. प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये पंजाब, चंदीगड आणि हरियाणामध्ये तीन दिवस मोठ्या उत्साहात गुरु नानक जयंती साजरी केली जाते. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरामध्ये भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. भारताप्रमाणेच जगभरात गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली ज़ाते.
गुरुनानक जयंतीचं महत्व
शीख धर्माची स्थापना करणारे गुरुनानक हे मोठे द्रष्टा संत होते. जगाला अध्यात्मिकता, मानवता, भक्ती, सत्य, शिक्षण अशा मूल्यांचं महत्त्व त्यांनी पटवून दिलं. म्हणूनच या दिवसाला 'प्रकाश उत्स्व म्हटलं जातं. गुरुनानक जयंतीच्या पहिल्या दिवशी गुरुद्वारा फुलांनी सजवली जाते. पुढील ४८ तास गुरुद्वारांसोबतच घरातदेखील 'गुरुग्रंथ साहेब'चं पठण केलं जातं. ५ सशस्त्र व्यक्तींच्या नेतृत्वाखाली पालखी आणि जुलूस निघतो. पालखीमधून गुरुग्रंथ साहेब नेला जातो. गुरुनानक जयंतीचा उत्सव दिवसभर चालू असतो. यामध्ये विविध भजन, गाणी यांचा समावेश असतो. तसेच पूजा विधी नंतर लंगर म्हणजे भोजन वाटपाचा कार्यक्रम असतो. मध्यरात्री पर्यंत गुरुनानक जयंती विविध कार्यक्रमांमधून साजरी केली जाते.
महाराष्ट्रात प्रामुख्याने नांदेड शहरात गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दिव्याची रोषणाई आणि फुलांनी गुरुद्वारा सजवल्या जातात.