Gudi Padwa 2021 Date: यंदा गुढीपाडवा कधी साजरा होणार? जाणून घ्या हिंदू नववर्षाचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त
महाराष्ट्रातील मराठी बांधवांचे नवीन वर्ष गुढीपाढव्यापासून सुरु होते. गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक. हिंदू संस्कृतीत या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.
Gudi Padwa 2021 Date & Significance: गुढी पाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा प्रारंभ. महाराष्ट्रातील मराठी बांधवांचे नवीन वर्ष गुढीपाढव्यापासून सुरु होते. महाराष्ट्रासोबतच आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्येही पाडवा 'उगादी', 'चेटी चांद' या वेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. यंदा गुढीपाडवा मंगळवार, 13 एप्रिल रोजी आहे.गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक. हिंदू संस्कृतीत या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.
गुढी पाडव्यानिमित्त घरोघरी गुढ्या उभारुन नववर्षाचे स्वागत केले जाते. मोठमोठ्या रांगोळ्या, रथ, देखावे सजवून शोभायात्रा काढल्या जातात. यात पारंपारीत वेशात उत्साही महिला-पुरुष सहभागी होतात. गुढी हे आपल्या आनंदाचे, यशाचे, आरोग्याचे, संपन्नतेचे आणि समाधानाचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे पूर्वी गावी मोठमोठ्या गुढ्या उभारल्या जायच्या. अजूनही गावी उंचच उंच गुढ्या उभारण्याची प्रथा आहे. गुढीपाडव्या दिवशी कडूलिंब-साखरेचा प्रसाद खाल्ला जातो. कटू-गोड अशा मिश्र प्रसादाने नवीन वर्षाची सुरुवात केली जाते.
गुढी उभारण्यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. राम वनवासावरुन परत आले तेव्हा गुढी उभारुन त्यांचे स्वागत करण्यात आले, अशी आख्यायिका आहे. नववर्ष स्वागतासाठी काठी, रेशमी वस्त्र, कडूलिंब, बत्ताशाची माळ, हार वापरुन गुढी उभारली जाते. गोडाचा नैवेद्य गुढीला दाखवला जातो आणि संध्याकाळी गुढीची पूजा करुन संध्याकाळी ती उतरवण्यात येते. (Gudi Padwa 2019: गुढीवरील रेशमी वस्त्र, कलश, कडूलिंब आणि इतर गोष्टींमागील महत्त्व आणि अर्थ काय?)
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने त्या दिवशी सोने किंवा नवीन वस्तू खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. तसंच नवीन वर्ष आपल्यासाठी नवी उमेद, आशा, स्वप्न घेऊन येत असतं. या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचा ध्यास गुढीपाडव्या निमित्त करुया.