Ghatasthapana 2021 Puja Vidhi: घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ वेळ

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते. काही सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्येही घट बसवतात.

Ghatasthapana 2021 Puja Vidhi (Photo Credits: Instagram)

यंदा 7 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. यंदा केवळ 8 दिवस हा उत्सव रंगणार आहे. भारतभर साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात नऊ दिवस दुर्गेच्या नऊ रुपांचे पूजन केले जाते. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरु होणाऱ्या या उत्सवाची सांगता दसऱ्याने होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते. काही सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्येही घट बसवतात. मात्र यंदा देखील या उत्सवावर कोविड-19 चे सावट असल्याने सेलिब्रेशनवर काही निर्बंध लादण्यात आले आहेत. परंतु, घरोघरी घटस्थापना करुन वर्षानुवर्षांची चालत आलेली परंपरा जपली जाईल.  घटस्थापना नेमकी कशी करावी? त्यासाठी शुभ वेळ, पूजा विधी काय? याबद्दल जाणून घेऊया... (Ghatasthapana 2021 Wishes In Marathi: घटस्थापना व नवरात्रीच्या शुभेच्छा, WhatsApp Status, Facebook Messages शेअर करत आप्तांच्या दिवसाची करा मंगलमय सुरूवात)

घटस्थापना शुभ मुहुर्त:

यंदा गुरुवार, 7 ऑक्टोबर रोजी अश्निन शुक्ल प्रतिपदा असल्याने या दिवशी घटस्थापना आहे. या दिवसापासून शारदीय नवरात्रोत्सवाचा प्रारंभ होईल. या दिवशी सकाळीची वेळ घटस्थापनेसाठी मंगलदायी मानली आहे. सकाळी 8 च्या पूर्वीची वेळ घट मांडून पूजा करण्यासाठी शुभ आहे.

घटस्थापना पूजा विधी:

# घटस्थापना करताना घट पाटावर किंवा चौरंगावर मांडला जातो. त्यामुळे चौरंग किंवा पाटा खाली रांगोळी काढून त्यावर हळद कुंकू घाला.

# चौरंग/पाटावर लाल वस्त्र अंथरा.

# टोपली किंवा पराती मध्ये माती घालून त्यात मिश्र धान्य पेरा. त्या मधोमध कलश ठेवा.

# कलश तयार करताना त्यात हळद-कुंकू, सुपारी, अक्षता, दुर्वा, सव्वा रूपया घाला. कलशाला हळदी कुंकुवाच्या प्रत्येकी 5 बोटं ओढा. कलशामध्ये नागवेलीची किंवा पाच प्रकारच्या पाच विविध पानांच्या मध्ये नारळ ठेवून सजवा.

# कलश परातीत किंवा टोपल्यात ठेवून ते चौरंगावर ठेवा.

# नारळावर बारीक काडी लावून त्यावर फुलं ठेवा.

# कलशाला हळद कुंकु, गंध अक्षता वाहून पूजा करा.

# कलशावर तुम्ही चुनरी देखील चढवू शकता. वेणी, गजरा घाला.

# दिवा-अगरबत्ती ओवाळा. दोन्ही बाजूला तुम्ही समया देखील लावू शकता.

# नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी एक अशी फुलांची माळ वाढवत जा.

# दर दिवशी सकाळ-संध्याकाळ आरती करून पूजा करा.

# परातीत/ टोपल्यात पेरलेल्या धान्यावर दिवसातून दोनदा थोडे थोडे पाणी घाला. नऊ दिवसांत ही धान्य छान वाढतात. त्याच्या वाढीनुसार आपल्या घराण्याची भरभराट होते, असे मानले जाते.

नवरात्रीत अशी करा घटस्थापना पहा व्हिडिओ

नऊ दिवसांत वाढलेले रोव देवीचा आशीर्वाद म्हणून महिलांना केसात माळण्यासाठी वाटले जातात. नवरात्रातीत दुर्गेची पूजा ही "निर्मिती शक्तीची" पूजा असते. नवरात्रीतील घटाला सृष्टीचे रुप मानले जाते. या काळात कन्या पूजन करुन देवीच्या रुपाची पूजा केली जाते.