Dr BR Ambedkar Jayanti 2022: राज्यभरात आजपासून सलग दहा दिवस साजरी होणार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती; जाणून घ्या कार्यक्रम
बाबासाहेब आंबेडकर समता कार्यक्रम राबविला जाणार असून, प्रत्येक जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी व सहाय्यक आयुक्त यांना सोपविण्यात आली आहे
सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती (Dr BR Ambedkar Jayanti 2022) राज्यभरात आजपासून (दि. 06) सलग दहा दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे व मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. 6 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम', राबविण्याचे नियोजन विभागाने केले असून, यासाठी विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी व देखरेख समिती गठीत करण्यात आली आहे.
दि. 06 एप्रिल रोजी सामाजिक समता कार्यक्रमाचे सर्व जिल्ह्यांमधून उद्घाटन करण्यात येईल व पुढील उपक्रमांची जिल्हास्तरावर माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. याची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी व सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आली आहे.
दि. 07 एप्रिल रोजी विभागाच्या सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येतील.
दि. 08 एप्रिल रोजी, जिल्हा व विभागस्तरावर कार्यक्रम आयोजित करून स्वाधार शिष्यवृत्ती, मिनिट्रॅक्टर आदी लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात येतील.
दि. 09 एप्रिल रोजी, ज्येष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृती संदर्भात मेळावे किंवा तत्सम उपक्रम तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयाने विभागाच्या शैक्षणिक आस्थापनांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले जातील.
दि. 10 एप्रिल रोजी, समता दूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात लघुनाट्य, पथनाट्य आदी माध्यमातून विभागाच्या योजनांच्या माहितीबाबत प्रबोधन करण्यात येईल.
दि. 11 एप्रिल रोजी, महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी करून विविध वक्त्यांना निमंत्रित करून महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येईल.
दि. 12 एप्रिल रोजी, मार्जिन मनी योजनेच्या जनजागृतीबाबत तसेच लाभ मिळालेल्या लाभार्थींसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येतील.
दि. 13 एप्रिल रोजी, संविधान जागर हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.
दि. 14 एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व कार्यालये, शाळा, वसतिगृहे इत्यादी सर्व आस्थापनांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी, व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जातील. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे व्याख्यान आयोजित केले जाईल. याच दिवशी सर्व जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत राहून, जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने वितरित करतील.
दि. 15 एप्रिल रोजी प्रत्येक सहाय्यक आयुक्त कार्यालयात महिला मेळावे आयोजित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महिलांविषयी कार्याची माहिती देणारे कार्यक्रम घेतले जातील. तसेच तृतीयपंथी याकरिता जनजागृती व नोंदणी करून ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबविण्यात येईल.
दि. 16 एप्रिल या अंतिम दिवशी, ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे तसेच वस्त्यांमध्ये विभागाचे लाभ मिळालेल्या व्यक्तिंचे मनोगत जाणून घेणे आदी उपक्रम राबवून या समता कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल. (हेही वाचा: Ramadan 2022: रमजान महिन्यात उपवास करण्याचे 5 फायदे! जाणून घ्या फायदा)
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता कार्यक्रम राबविला जाणार असून, प्रत्येक जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी व सहाय्यक आयुक्त यांना सोपविण्यात आली आहे, असे मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे व मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी कळविले आहे.