NMC मानांकनांचे उल्लंघन, 40 वैद्यकीय महाविद्यालयांनी मान्यता गमावली; आणखी 100 रडारवर

इतकेच नव्हे तर आणखी 100 महाविद्यालयेही रडारवर असून त्यांचीही मान्यता काढून घेतली जाण्याची शक्यता आहे.

Doctor प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) निर्धारित केलेल्या मानकांची पूर्तता न करणाऱ्या तब्बल 40 वैद्यकीय महाविद्यालयांची (Medical Colleges) मान्यता काढून घेण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर आणखी 100 महाविद्यालयेही रडारवर असून त्यांचीही मान्यता काढून घेतली जाण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था एनआयएने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, पुडुचेरी, गुजरात, आसाम, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधील आणखी 100 वैद्यकीय महाविद्यालये देखील NMC च्या मानकांचे पालन न केल्यामुळे मान्यता गमावण्याची शक्यता आहे.

एनआयएने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, जवळपास एका शतकाची परंपरा लाभलेले अरुणाचल प्रदेशातील एका वैद्यकीय महाविद्यालयावरही ही कारवाई करण्यात आली आहे. एनएमसीच्या कारवाईचा भाग म्हणून या महाविद्यालयाने मान्यता गमावली आहे. या संस्थांनी निकषांचे पालन न केल्यामुळे तसेच प्राध्यापक आणि सुरक्षा (सीसीटीव्ही) कॅमेऱ्यांशी संबंधित त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आली, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, काही डॉक्टरांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला देखील NMC ने केलेल्या कारवाईबद्दल पत्र लिहिले आहे कारण मानकांचे पालन न करणे या संस्थांच्या इतर त्रुटी आहेत. डॉक्टरांनी अशी भीती व्यक्त केली आहे की या कारवाईमुळे त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो आणि विश्वासार्हता देखील कमी होऊ शकते.. (हेही वाचा: कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स जारी; 1 डिसेंबर पासून लागू होणार नवे नियम)

सरकारी आकडेवारीनुसार, देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 2014 मधील 387 वरून सध्या 654 पर्यंत वाढली आहे, जवळजवळ दुप्पट झाली आहे. एमबीबीएसच्या जागांची संख्याही 94 टक्क्यांनी वाढली आहे.