India's Largest Trading Partner: 2022-23 मध्ये अमेरिका बनला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार; चीन दुसऱ्या क्रमांकावर; 'या' देशांचा टॉप 5 मध्ये समावेश
तो 1.5 टक्क्यांनी घसरून 113.83 अब्ज डॉलर झाला आहे, तर 2021-22 मध्ये हा आकडा 115.42 अब्ज डॉलर होता. 2021-22 च्या तुलनेत 2022-23 मध्ये भारताची चीनला होणारी निर्यात 28 टक्क्यांनी घसरून 15.32 अब्ज डॉलर झाली आहे.
India's Largest Trading Partner: 2022-23 या आर्थिक वर्षात अमेरिका (America) भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार (Trading Partner) म्हणून उदयास आला आहे. उभय देशांमधील व्यापारात वाढ अशा वेळी होत आहे, जेव्हा अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने मजबूत झाले आहेत. वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार 7.65 टक्क्यांनी वाढून 128.55 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे, जो 2021-22 मध्ये 119.5 अब्ज डॉलर होता. 2020-21 मध्ये तa 80.51 अब्ज डॉलर होता.
मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात भारताची अमेरिकेला होणारी निर्यात 2.81 टक्क्यांनी वाढून $78.31 अब्ज झाली आहे, जी 2021-22 मध्ये 76.18 अब्ज डॉलर होती. त्याच वेळी, आयात 16 टक्क्यांनी 50.24 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. 2022-23 मध्ये भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार अधिशेष 28 अब्ज डॉलर होता. (हेही वाचा - Ukraine-Russia War: युक्रेनचे अध्यक्ष Vladimir Zelensky यांच्यावर तब्बल 400 दशलक्ष डॉलर्सच्या घोटाळ्याचा आरोप; इंधन खरेदीसाठी अमेरिकेने पाठवली होती मदत- Reports)
दरम्यान, 2022-23 मध्ये भारत आणि चीनमधील व्यवसायात घट झाली आहे. तो 1.5 टक्क्यांनी घसरून 113.83 अब्ज डॉलर झाला आहे, तर 2021-22 मध्ये हा आकडा 115.42 अब्ज डॉलर होता. 2021-22 च्या तुलनेत 2022-23 मध्ये भारताची चीनला होणारी निर्यात 28 टक्क्यांनी घसरून 15.32 अब्ज डॉलर झाली आहे. त्याच वेळी, आयात 4.16 टक्क्यांनी वाढून 98.51 अब्ज डॉलर झाली आहे. भारताची चीनसोबतची व्यापार तूट 2021-22 मध्ये 72.91 बिलियन डॉलर वरून 2022-23 मध्ये 83.2 बिलियन डॉलर झाली आहे.
तथापी, 2013-14 ते 2017-18 आणि 2020-21 मध्ये चीन भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. चीनपूर्वी भारताच्या व्यापार भागीदारांच्या यादीत UAE चे नाव अग्रस्थानी होते. UAE, सौदी आणि सिंगापूर हे टॉप 5 व्यापारी भागीदारांमध्ये समाविष्ट आहेत. 2022-23 मध्ये UAE 76.16 अब्ज डॉलरसह तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार होता, सौदी अरेबिया 52.72 अब्ज डॉलरसह चौथ्या आणि सिंगापूर 35.55 अब्ज डॉलरसह पाचव्या क्रमांकावर होता.