आता भाजप आणि कॉंग्रेसची उडणार झोप; उत्तर प्रदेशात 'सपा' आणि 'बसपा'ची आघाडी
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी (SP) आणि बहुजन समाज पार्टी (BSP) ने आघाडी केली आहे
2019 च्या लोकसभा निवडणुकी (LokSabha elections) चे पडघम संपूर्ण देशात वाजत आहेत. सध्याच्या मोदी सरकारवर नाराज असलेल्या विविध पक्षांनी यावेळी मोदी सरकारला पायउतार करण्याचा चंगच बांधला आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये एक मोठी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी (SP) आणि बहुजन समाज पार्टी (BSP) ने आघाडी केली आहे. नुकत्याच घडलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि मायावती (Mayawati) यांनी ही घोषणा केली. या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांची झोप उडाली असेल, असे मायावती म्हणाल्या. उत्तर प्रदेशच्या एकूण 80 लोकसभा जागांपैकी सपा आणि बसपा प्रत्येकी 38 जागांवर लढणार आहेत.
येत्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातून उत्तरप्रदेश हे फार महत्वाचे राज्य मानले जाते. कॉंग्रेस, भाजप, सपा आणि बसपा अशा चारही महत्वाच्या पक्षांनी हे राज्य काबीज करून घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. या आघाडीमध्ये कॉंग्रेसला सहभागी करू घेतले नसले तरी, अमेठी आणि रायबरेलीची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशातील 80 पैकी 73 जागा मिळाल्या होत्या. सपा आणि बसपा या दोन पक्षांमध्ये झालेल्या मतविभागणीचा मोठा फायदा भाजपला झाला होता.
कधीकाळी एकमेकांचे कट्टर दुश्मन समजले जाणारे बसपा आणि सपा यांची आघाडी राजकीय वर्तुळातील फार मोठी घटना मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला सामोरे जाण्यासाठी एकत्र येऊन लढण्याबाबत अखिलेश यादव आणि मायावती यांच्यात नुकतीच दिल्लीत तब्बल 3 तास चर्चा झाली होती. यामध्ये जागा वाटपाविषयी बोलणी झाल्याचे समजते.