IPL Auction 2025 Live

Indian Railways: भारतीय रेल्वे आता मास्क न घातलेल्या प्रवाशांकडून आकारणार 'इतका' दंड

देशात वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. मात्र, तरीही अनेकजण कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत.

Indian Railway | Photo Credits : PTI

भारतात पुन्हा एकदा कोरोनाचे (Coronavirus) जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहेत. देशात वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. मात्र, तरीही अनेकजण कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. याचपार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने (Indian Railways) आज महत्वाची घोषणा केली आहे. तसेच रेल्वे परिसर किंवा रेल्वेतून प्रवास करताना जर कोण विनामास्क आढळल्यास त्यांच्याकडून दंड आकारण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार, प्रवाशांकडून 500 रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे.

सध्या भारतावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रचंड प्रादुर्भाव दिसून येत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जिथे दररोज 11,000 नवबाधित आढळत होते तिथे 10 एप्रिल रोजी 1,52,565 नवबाधित आढळून आले आहेत. महाराष्ट्र, छत्तीसगढ, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि गुजरात येथे सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून विनामास्क आढळणाऱ्या प्रवाशांकडून 500 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या निर्णयामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्राला राजकारणाचे डोस देणं थांबवून राज्याची जबाबदारी घ्यावी- पीयुष गोयल

जगभरात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण भारतात आढळून येत आहेत. भारतात गेल्या 24 तासांत तब्बल 2 लाख 739 रुग्ण आढळून आले आहेत. तर, 1 हजार 38 मृत्युची नोंद झाली होती. गेल्या वर्षी 2 ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच देशात सर्वाधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर 93 हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. याआधी मंगळवारी 1 लाख 84 हजार 372 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.