सन २०१९: राहुल गांधी देणार मोदींना टक्कर पण, या आहेत अडचणी
पण, त्याचा वापर करुन घेण्यासाठी काँग्रेस समोर काही महत्त्वपूर्ण अडचणी असणार आहेत.
पुढच्या वर्षी (२०१९) होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांना अद्याप अवधी आहे. त्यामुळे थेट प्रचाराचे बिगूल अद्याप कोणत्याच पक्षाने फुंकले नाही. पण, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सर्वच राजकीय पक्षांनी तयारी मात्र जोमाने सुरू केली आहे. यात प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेस असे दोन पक्ष राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. दरम्यान, भाजपने आतापासूनच रणनिती आखायला सुरू केली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे चलनी नाणे जवळ असल्याने भाजच्या गोटात उत्साह आहे. तर, २०१४चा पराभव जिव्हारी लागलेली काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरली आहे. भाजपकडून प्रचाराच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख चेहरा असतील. तर, काँग्रेस कडून युवा नेते राहुल गांधी असतील हे स्पष्ट आहे. त्यामुळे निवडणुकीत संघर्ष पक्षीय पातळीवरील असला तरी, मुख्य लढाई ही या दोघांमध्येच होईल हे नक्की. अर्थात, जी आश्वासने देऊन भाजप प्रणीत मोदी सरकार सत्तेवर आले. त्याचा लेखाजोखा अर्थातच या निवडणुक प्रचारात घेतला जाईल. त्यामुळे भाजपच्या विरोधात रान उठविण्यासाठी बरेच बाण काँग्रेसच्या भात्यात आहे खरे. पण, त्याचा वापर करुन घेण्यासाठी काँग्रेस समोर काही महत्त्वपूर्ण अडचणी असणार आहेत. पक्षाध्यक्ष आणि प्रचारातील प्रमुख चेहरा म्हणून ही आव्हाने राहुल गांधी कशी पेलतात यावर काँग्रेसच्या घोडदौडीची आणि पर्यायाने विजयाची मदार आहे.
भाजप विरोधात लढण्यासाठी काँग्रेसमोरच्या प्रमुख अडचणी
रिकामा खजीना:
प्रदीर्घ काळ सत्तेत राहिलेली आणि एकेकाळी श्रीमंत पक्ष अशी बिरुदावली असलेला काँग्रेस. हा पक्ष सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. एडीआरच्या अहवालानुसार गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अलिकडी काळात काँग्रेसच्या पक्षनिधीत सुमारे ३६.२० कोटी रुपयांची घसरण झाली आहे. तर, त्या तुलनेत भाजप भलताच वजनदार झाला आहे. जिथे भाजपला तब्बल १००० कोटी रुपयांचा निधी मिळाला तिथे, काँग्रेसला केवळ ५० कोटी रूपयांचा निधी मिळाला. त्यामुळे पक्षाला निवडणूक प्रचार, प्रचारयात्रा, सोशल मीडिया आदिंवर खर्च करण्यासाठी निधीची कमतरता जाणवत आहे. त्यातच अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागल्यामुळे राज्यातील सत्तेतूनही काँग्रेस बेदखल आहे. त्यामुळे प्रादेशिक पातळीवरूनही निधीची कुमक म्हणावी तशी येत नाही. दुसऱ्या बाजूला भाजपचा खजीना ओतप्रोत भरला आहे. त्याचा फायदा असा की, सोशल मीडिया, मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमं, प्रचार फेऱ्या, सभा आदींमधून भाजप आक्रमक प्रचार करु शकते. त्यामुळे निधीची आर्थिक तूट भरुन काढणे काँग्रेससमोरील महत्त्वाचे आव्हान आहे.
प्रभावी चेहऱ्याचा अभाव:
केवळ पैसाच नव्हे तर, काँग्रेसकडे काहीसा प्रभावी चेहऱ्याचाही अभाव आहे. अर्थात, गेल्या काही काळात राहुल गांधींनी स्वत:ची छबी मोठ्या कष्टपूर्वक बदलली आहे. त्यामुळे आजवर त्यांच्या कामगिरीवर निर्माण होणारे प्रश्नचिन्ह काहीसे कमी झाले आहे. पण, विरोधकांनी राहुल गांधींची प्रतिमा इतक्या सहजपणे पुसली जाणे काहीसे कठीण आहे. त्यात राहुल गांधी आपल्या भाषणातून संदर्भ देताना अनेकदा अडखळतात किंवा भलतीच विधाने करतात. अनेकदा त्यांच्या या विधानावरुन विरोधक किंवा सोशल मीडियातून ते टवाळीचा विषय ठरतात. पण, असे असले तरी राहुल गांधी जोरदार प्रयत्न करतायत. त्यामुळे काँग्रेसमध्येही उत्साह निर्माण होत आहे. दरम्यान, अनेक राज्यांमध्येही स्थानिक पातळीवर काँग्रेसला चहऱ्यांचा अभाव आहे. कारण, बरेच चेहरे वर्षानुवर्षे त्या त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामुळे पक्ष म्हणूनही कार्यकर्त्यांच्या मनात एक साचलेपण आहे. त्यामुळे याकडेही पक्षनेतृत्वाला ध्यान द्यावे लागेल.
विरोधकांमधला एकजुटीचा अभाव
२०१९मध्ये काँग्रेस स्वबळावर भाजपला सत्तेबाहेर असे चित्र सध्यातरी नाही. त्यामुळे काँग्रेसला इतर पक्षांसोबत आघाडी तर, करावीच लागेल. काळाची पावले ओळखून काँग्रेसही कामाला लागली आहे. काँग्रेस इतर पक्षांना ज्या पद्धतीने सोबत घेत आहे. त्यामुळे भाजपच्या गोटातही काहिसे नाराजीचे वातावरण आहे. पण, असे असले तरी, काँग्रेसला अद्याप विरोधी पक्षांना एका सूत्रात बांधणे अद्याप योग्य पद्धतीने जमले नाही. गेल्या काही काळात काँग्रेसने विरोधकांच्या एकजुटीसाठी केलेल्या अनेक प्रयत्नांना म्हणावे तसे यश आले नाही. तसेच, भाजप विरोधात आघडी केली तर, त्याचे नेतृत्व कोणी करायचे याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे चेहरा नसलेल्या आघाडीवर देशातील नागरिकांनी कसा भरवसा ठेवायचा असाही प्रश्न विचारला जात आहे. अर्थात, अद्याप बरेच पाणी पुलाखालून वाहायचे आहे. त्यामुळे इतक्यातच कोणत्या ठोस निष्कर्षापर्यंत येता येणार नाही.