Coronavirus Vaccine च्या ट्रायलमुळे निर्माण झाले साईड इफेक्ट्स; चेन्नईच्या व्यक्तीने Serum Institute कडे मागितली 5 कोटींची नुकसान भरपाई
या दरम्यान त्यांनी लसीच्या (Coronavirus Vaccine) तयारीबाबत चर्चा केली. एकीकडे सीरमच्या लसीबाबत अपेक्षा वाढत आहेत,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुण्यातील सीरम इंस्टीट्यूटला (Serum Institute) भेट दिली. या दरम्यान त्यांनी लसीच्या (Coronavirus Vaccine) तयारीबाबत चर्चा केली. एकीकडे सीरमच्या लसीबाबत अपेक्षा वाढत आहेत, तर दुसरीकडे सीरम संस्थेच्या कोविशील्ड (Covishield) लसीच्या चाचणीत भाग घेणाऱ्या तामिळनाडूमधील 40 वर्षीय व्यक्तीने या लसीच्या दुष्परिणामांमुळे संस्थेला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. याबरोबरच आयसीएमआर, डीसीजीआय, अॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड लस आणि श्री रामचंद्र संस्थेलाही नोटिसा पाठविल्या आहेत. या लसीचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला असल्याचा दावा नोटीसमध्ये करण्यात आला असून, त्या बदल्यात पाच कोटींची मागणी करण्यात आली आहे.
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, ही व्यक्ती ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात सहभागी झाली होती. श्री रामचंद्र उच्च शिक्षण व संशोधन चेन्नई येथे या चाचण्या घेण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर अॅस्ट्रॅजेनेकाद्वारे विकसित केलेली ही लस देशातील सर्वात मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट, पुणे येथे भारतात तयार केली जात आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, लसीकरणानंतर सहभागींना आपल्या आरोग्यावर तीव्र दुष्परिणाम सहन करावे लागले. सार्वजनिकरीत्या या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला नाही. याबाबत नुकसान भरपाई म्हणून सहभागी व्यक्तीने 5 कोटींची मागणी केली आहे.
हे दुष्परिणाम अशा वेळी समोर आले, जेव्हा ब्रिटनमध्ये लसीचे प्रतिकूल परिणाम दिसून आल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटने लगेचच त्याची चाचणी थांबविली होती आणि काम सुरू ठेवण्यापूर्वी नियामक मान्यता मागितली होती. 21 नोव्हेंबर रोजी अॅड. आर राजाराम यांनी ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे, ज्याला अद्याप लस उत्पादकाकडून प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत पुढील आठवड्यात न्यायालयात याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: कोविशिल्ड लशीबाबत सीरम इन्स्टिट्युटचे अदर पुनावाला यांची महत्वाची माहिती)
नोटीसमध्ये नमूद केले आहे की, सहभागीने 1 ऑक्टोबरला ही लस प्राप्त केली आणि 11 ऑक्टोबरला त्याला डोकेदुखीचा तीव्र त्रास सुरू झाला. त्याला न्यूरोएन्सेफॅलोपॅथीचा त्रास झाला आणि 26 ऑक्टोबरला त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. ती व्यक्ती अद्याप स्थिर नाही, त्याची मनःस्थिती बदलली आहे, गोष्टी समजून घेण्यास अडचण येत आहे आणि त्याला रोजच्या गोष्टी करणेही कठीण झाले आहे. मात्र सीरमने दिलेल्या संमती फॉर्ममध्ये असे म्हटले आहे की, अभ्यासादरम्यान सहभागी आजारी पडल्यास कंपनी त्यांना योग्य उपचार घेण्यास मदत करेल.